महाराष्ट्र

माहिती मिळताच धावली नेट.. गर्भवती महिलेची केली प्रसूती थेट


अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने दिला गरोदर मातेस पुनर्जन्म

अलिबाग, रायगड, दि.6 (जिमाका) : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या.

    

त्यावेळी श्रीमती  कांबळे  यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने  श्रीमती कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ  ऑटोरिक्षा बोलाविली आणि  आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन श्रीमती मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल  केले.

    

पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी श्रीमती मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली.

     

श्रीमती मंगल सीद यांची  नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे.

     

कोरोना विषाणूच्या या संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात असूनही रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व  आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिला आहे.

00000

Most Popular

To Top