महाराष्ट्र

‘आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशन’मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

मुंबई, दि. ११ : कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी शासनाच्या बरोबरीने अनेक मदतीचे हात पुढे येत असून आज राज्यातील दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ७५ हजार ८११ रुपयांची मदत देण्यात आली. राज्याचे गृह आणि गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी या रकमेचा धनादेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या पत्नींची ही संघटना असून विविध सामाजिक कार्यात संघटना सहभागी असते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव देशातील सर्व राज्यांमध्ये झाला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणे, गोरगरीब मजूर, स्थलांतरित कामगार यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे, सर्व ठिकाणांची स्वच्छता करुन जंतुनाशकांची फवारणी करणे यांसारख्या अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून दी आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्यात आली आहे.  यावेळी मंत्री सर्वश्री अनिल  देशमुख, राजेश टोपे, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

Most Popular

To Top