मुंबई, दि.13 : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि संशोधन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वस्तुवरील निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टॉर्च निर्मिती राज्यात करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
श्री.सामंत म्हणाले, दैनंदिन जीवन जगताना आपला विविध वस्तुंना स्पर्श होत असतो आणि त्यातूनच विषाणूंचे संक्रमण इतरांना होण्याची शक्यता असते. विज्ञानातील उपलब्ध माहितीनुसार कोणताही विषाणू नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे अतिनील किरणे. या टॉर्चच्या माध्यमातून 16-33 वॅट एवढ्या क्षमतेच्या अतिनील किरणांचा पुरवठा होऊ शकतो.
एखादी वस्तू भाजीपाला किंवा फळ, या टॉर्चच्या संपर्कात आले आणि त्यावर अतिनील किरणांचा मारा झाला तर एकसंधपणे ती किरणे सर्वत्र विखुरली जातात आणि त्या वस्तूचे निर्जंतुकीकरण होते.
अतिनील किरणांचा विषाणूंवर मारा झाला की RNA ची रचनाच बदलली जाते त्यामुळे तो विषाणू स्वतःची संख्या वाढवण्यामध्ये असमर्थ ठरतो व तो तिथेच नामशेष होतो.
या किरणांचे महत्त्व जाणून परदेशामध्ये अतिनील किरणे वापरून बनलेली उपकरणे सध्या बाजारात आलेली आहेत. चीनमध्ये यांच्या मदतीने विविध वायुवाहने (विमान,हेलिकॉप्टर) बस इ.वाहने निर्जंतुक करण्यात येत आहेत. याबरोबरच मोबाईल, संगणक, किबोर्ड हेदेखील निर्जंतुक केले गेले आहेत.
भारतामध्ये विशेषकरून याचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. पाण्यातील जीवजंतू जीवाणू मारण्यासाठी अतिनील किरणांचा वापर केला जातो.
भाजी मंडईत, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचा भाजी घेताना पैसे, नोटा, व्यक्तींशी संपर्क होत असतो, यातूनच या विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. या सर्व बाबींचा विचार करता यंत्राची निर्मिती करणारे तज्ज्ञ आणि संशोधक यांच्या मदतीने अतिनील किरण वापरून निर्जंतुकीकरण होणाऱ्या टॉर्चची यशस्वीरीत्या निर्मिती केली आहे. साधारणपणे विद्युत ऊर्जेवर चालणारी ही बॅटरी असून हाताळण्यासाठी फारच सहज आणि सोपी आहे.
अतिनील किरणांशी शरीराचा संपर्क आल्यास त्याचे विघातक परिणाम आरोग्यावर होतात.त्यामुळे मानवी शरीराशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे.
सॅनिटायझर टनेल निर्मिती करणारे शिवाजी विद्यापीठातील प्रा. डॉ आर.जी.सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे आणि कु.पूनम सोनकवडे या भावंडांनी या टॉर्च ची निर्मिती केली आहे. अनिकेत सोनकवडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र येथे व्यावसायिक कोर्स च्या प्रथम वर्षात शिकत आहे.तर पूनम सोनकवडे या आबासाहेब गरवारे महाविद्यालय,पुणे येथे बी. एस. सी.(सूक्ष्मजीवशास्त्र) च्या द्वितीय वर्षामध्ये शिकत आहेत. या कार्याबद्दल श्री. सामंत यांनी अभिनंदन करून पुढील संशोधनास शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी असे नाविन्यपूर्ण संशोधन करून सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. सामंत यांनी यावेळी केले. पीएलए इलेक्ट्रो अप्लायसेस प्रायव्हेट लि. प्ले हाऊस, ठाकोर इस्टेट कुर्ला-किरोल रस्ता, विद्याविहार (डब्ल्यू), मुंबई या कंपनीच्या साह्याने या टॉर्च ची निर्मिती करण्यात येत आहे.
0000
श्रीमती काशीबाई थोरात, वि.सं.अ.