महाराष्ट्र

स्वस्त धान्यापासून वंचित असलेल्या राज्यातील ५ कोटी लोकांसाठी केंद्राने मदत करावी

केंद्र सरकारकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असून त्यात सवलत मिळावी – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान आणि छगन भुजबळ यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई, दि.13 : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणारे अंत्योदय व बीपीएल योजनेच्या 7 कोटी लाभार्थीना सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य राज्याकडे उपलब्ध आहे, परंतु राज्यातील सुमारे 5 कोटी लोक असे आहेत की जे सवलतीच्या स्वस्त धान्यापासुन वंचित आहेत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी. तसेच राज्य शासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्राकडून खरेदी केले जाणारे धान्य महाग असुन त्यात सवलत मिळावी अशी मागणी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

केंद्र शासन व राज्य शासनतर्फे कोरोना साथरोगावर नियंत्रण मिळण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देशातील प्रत्येक राज्यात अन्न पुरवठ्याबाबत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगद्वारे संवाद साधला. देशातील प्रत्येक राज्यातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच सचिव या व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथून मंत्री श्री.भुजबळ व मंत्रालय मुंबईतून अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंदारे उपस्थित होते.

यावेळी बालेतांना मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर राज्यात शिवभोजन थाळीच्या माध्यमातून केवळ 5 रुपयात 1 लाख थाळींचे दररोज वितरण सुरु आहे. 5 हजार 500 अन्नछत्राच्या माध्यमातून दोन वेळचे जेवण व नाष्टा विस्थापित मजुर, कामगारांना मोफत दिला जात आहे. हजारो अशासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्नदानाचे उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत, असे असले तरी हे सर्व पुरेसे नाही. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत बसणारे 7 कोटी अंत्योदय व बीपीएल कार्डधारक राज्यात आहेत. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील 50 लाख लाभार्थीना राज्यशासनाने सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील 3 कोटी केशरी कार्डधारकांनाही स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने 3 कोटी 50 लाख लोकांसाठी केंद्र शासनाकडून राज्यशासन धान्य खरेदी करणार असुन त्यासाठी येणारा खर्च 300 कोटी इतका आहे. हा खर्च अत्यंत मोठा असुन त्यामुळे राज्यातील 3 कोटी केशरी रेशन कार्डधारक आणि ज्यांच्याकडे काहीही नाही अशा विस्थपित व बेघर असलेले 2 कोटी नागरिक अशा 5 कोटी नागरिकांसाठी केंद्र शासनाने मदत करण्याची गरज असुन तशी मागणी राज्यातील विविध लोकप्रतिनिधींमार्फत केली जात आहे याबाबतही यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी केंद्र शासनाला अवगत केले.

केंद्र शासनामार्फत चनाडाळ किंवा तूरदाळ प्रत्येक नागरिकाला 1 किलो मोफत दिली जाणार असून ती येणाऱ्या काही दिवसात केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे असेही यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

Most Popular

To Top