पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई दि. १७: रब्बी हंगाम २०२० चा कापणी अहवाल शासनाने स्वीकारला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा ६.५० क्विंटल ऐवजी आता ११.२९ क्विंटल खरेदी केला जाणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच लातूर जिल्ह्यात रब्बी हमीभाव केंद्र उशीराने सुरू झाले आहेत. त्यात शासनाने कृषी विभागाचा अंदाजित उत्पादन अहवाल गृहीत धरून प्रति हेक्टर फक्त ६.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यास सुरूवात केली होती. प्रत्यक्षात यावर्षी हरभराचे हेक्टरी उत्पादन १० ते १५ क्विंटल पर्यंत झाले आहे. शेतकऱ्यांचा हरभरा पूर्णपणाने हमीभाव केंद्रावर स्वीकारला जात नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता होती. पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेतल्या नंतर सहकार तसेच कृषीमंत्री यांच्याशी बोलून यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.
दिलेल्या आश्वासनानुसार पालकमंत्री यांनी लातूर जिल्ह्यात सरासरी हेक्टरी १०.६८ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाल्याचे शासनाच्या निर्दशनास आणून दिले व त्या पद्धतीने हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा स्वीकारला जावा अशी मागणी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या सततच्या पाठपुरावा नंतर शासनाने सन २०१९-२० प्रत्यक्ष कापणी अहवाल समोर ठेऊन लातूर जिल्ह्यात हेक्टरी १०.२९ क्विंटल हरभरा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
शासनाच्या या निर्णयानुसार आता राज्यातील ठाणे ७.१, पालघर ७.२८, रायगड ४.१८, रत्नागिरी ४.७८, नाशिक ८.२१, धुळे १३.५, नंदूरबार ११.८१, जळगाव १२.६५, अहमदनगर ९.९०, पूणे ९.९, सोलापूर ७.१२, सातारा ९.३८, सांगली ७.८०, कोल्हापूर ९.१६, औरंगाबाद ९.६२, जालना १०.५८, बीड ११.५६, लातूर ११.२९, उस्मानाबाद ८.५, नांदेड १७.८, परभणी ८.६८, हिंगोली ९.८५, बुलढाणा १४.१२, अकोला १३.६, वाशीम ८.४७, अमरावती १४.४३, यवतमाळ १८.४२, वर्धा ९.२९, नागपूर १०.८५, भंडारा ६.१७, गोदिया ४.७७, चंद्रपूर ८.९९, गडचिरोली ४.२८ क्विंटल हरभरा खरेदी केंद्रावर स्वीकारला जाणार आहे.
00000
वर्षा आंधळे/विसंअ