महाराष्ट्र

स्वच्छतेचे ॲम्बॅसडर ‘ अजितदादा ‘ :- लेख :- सतीश ज्ञानदेव राऊत

स्वच्छतेचे ॲम्बॅसडर ‘ अजितदादा

एक दिवस भल्या सकाळी दादा साहेबांच्या दिल्लीतील ६, जनपथ या घरी येणार म्हणून घरगड्यांची लगबग होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर उत्कंठा कमी आणि धास्तीच अधिक दिसत होती. माझ्या ते लक्षात आले पण मी फार काही विचार केला नाही. थोड्याच वेळात दादांची गाडी आत आली. कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहून ते अलिकडेच उतरून , त्यांचा नमस्कार स्विकारत पोर्चकडे जाऊ लागले .

दादा कोपऱ्यावरील झाडाच्या सावलीतून पुढे जाऊ लागले तोच दबा धरून बसलेला शिपाई दादांच्या दिशेने पळाला ! पण तो दादांपर्यंत पोचण्या आधीच झाडाचं एक वाळलेलं पान हवेतून भिरकी घेत दादांच्या पुढ्यात पडलं ! आरशासारख्या झाडून-पुसून लख्ख केलेल्या बंगल्याच्या प्रांगणात पडलेल्या एका पानानं पंचाईत केली ! ‘भित्यापाठी ब्रम्हराक्षस !’ घरगड्यांची धास्ती खरी ठरली ! दादांनी हळूच वाकून ते वाळकं पान हातात घेतलं आणि त्या शिपायाकडे देत नापसंतीच्या स्वरात ‘ का रे ! अंगण नीट स्वच्छ ठेवता येत नाही का ? ‘ असं दरडावून बजावलं !

दादांचा स्वच्छतेच्या बाबतीतील हा कटाक्ष सगळ्यांच्याच मनात अशीच धास्ती भरवतो ! स्वच्छ शुभ्र खादी वेशभुषेतील दादा गाडीतून दादा उतरले की त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडतो ! त्यातूनही एखाद्याचे गबाळेपण दिसले की त्यावर दादांची कडक टिप्पणी पडतेच ! एखादी वस्तू अथवा वास्तू कितीही टापटीपीत ठेवा ! दादांची तीक्ष्ण नजर मळका डाग टिपतेच ! ट्यूबच्या काचेवर जमलेला धूळीचा स्तर , गाडीच्या दरवाज्याच्या हॅंडलखालचा मळका तेलकट थर , काही -काही सुटत नाही त्यांच्या नजरेतून ! एखादा टेबल , एखादी काच नुसती दुरून झकपक दिसून चालत नाही ! दादा जवळ जाऊन त्या वस्तूवरुन हलकेच बोट फिरवतात आणि ‘ हे बघा !’ म्हणून बोटाला चिकटलेला मळ दाखवतात ! यजमानाच्या काळजाचा ठोका मात्र केव्हाचाच चुकलेला असतो !

दादा कोणत्याही घरी अथवा कार्यालयात गेले की ! लोक अदबीने उभे राहतात ! पण दादा अचानक खाली वाकून कागदाचा लहानसा कपटा उचलतात . कचऱ्याच्या बकेट मध्ये टाकतात ; भांबावलेल्या नोकराला टेबलावर पडलेले चहाचे कप , पाण्याचे रिकामे ग्लास उचलण्याची सुचना देतात. इतस्तत: पडलेले जोडे पाहिले की आपल्याला जोडे पडलेच समजा ! अस्ताव्यस्तपणा , अजागळपणा हे शब्द त्यांच्या शब्दकोशात नाहीत ! त्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी धूळ अजून जन्माला यायची आहे .

दादांचे आगमन होणार असले की ती कोणत्याही यजमानाची सत्वपरिक्षा असते ! कितीही अभ्यास करा , मार्क्स हे कमीच मिळणार ! ठाण्याचे नजीबमुल्ला एकदा एका हिंदी सुपरस्टार अभिनेत्याच्या इंटेरिअस डिझाईनिंग मध्ये पारंगत असलेल्या पत्नीने सजवलेला हॉल दाखवण्यासाठी दादांना घेऊन गेले. तो पंचताराकित श्रीमंती थाट पाहून इतरांचे डोळे दिपले आणि दादा काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे लागले ! दादांनी नजीबला स्वत: उभे असलेल्या ठिकाणी उभे केले आणि त्याचे हॅालच्या फॅालसिलिंगकडे लक्ष वेधले ! दादा म्हणाले, “ सगळं छान आहे पण असं कोपऱ्यातून पाहिलं की फॅालसिलिंगमधील विजेचा दिवा नीट झाकलेला नाही असं दिसतं !” काचेच्या अर्धपारदर्शी तावदानातून डोकावणारा बल्ब पाहून नजीब उडालाच ! बाकीच्यांचीही बत्ती गुल झाली . अभिनेत्याच्या डिझायनर पत्नीचा पांढराफटक पडलेला चेहराही बघण्यासारखा होता ! दादांच्या ‘बाझ की नजर पर कोई संदेह नहीं करते’ हेच खरे !

दादांची बारामतीतील भ्रमंती सगळ्या यंत्रणांची धांदल उडवणारा असते ! रस्स्याच्या दुभाजकावरचा दगड हलला ; एखादं झाड सुकलं ; बांधकामातली एखादी वीट चुकीची बसली अथवा रंग फसला तर दादा अधिकाऱ्यांवर , कंत्राटदारांवर कडाडतात ! जगाच्या जागी दुरूस्तीचा आदेश देतात. त्यांच्या कटाक्षात नीटनेटकेपणा आणि सौंदर्यदृष्टी यांचा उत्कृष्ट मिलाप असतो. एखाद्या वास्तूचे डिझाईन , लँडस्केपींग, टाईल्सचा प्रकार , भिंतींचा रंग , खिडक्यांचे कर्टन्स , फर्निचरचा साज ह्या सगळ्या बाबतीत दादांची स्वत:ची एक चॅाईस आहे. ते चीजवस्तूच्या रंगसंगतीपासून ते दर्जा राखण्याबाबत अगदी दक्ष असतात . साहेबांनी बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला ; दादा नव्या निर्मितीबरोबरच त्यावर सुंदर मुलामा चढवण्याचे काम करीत आहेत.

दादांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय मला ही आला . भोसरी-मोशी दरम्यानच्या स्पाईनरोड वर माझा भाचा चेतन पवारने कपड्यांचे फॅक्टरी आऊटलेट उघडले. दादा मोबाईलच्या एका मेसेजवर उद्घाटनासाठी आले. फित कापून दादा आत आले तसे त्यांनी बरोब्बर समोर असलेल्या रॅकवर विक्रीसाठी बूट ठेवलेले पाहिले. “राऊत , दुकान कपडयाचं आहे पण आत आल्यावर लगेच समोर जोडे ठेवलेत , हे बरोबर दिसत नाही ! ते कोपऱ्यात मांडा ! “ दादांनी भरगच्च गर्दीतही आपलं स्पष्ट मत दणकन मांडलं ! दुकानाच्या मॅनेजरला देखील ही शालजोडीतील भेट मिळाली. जोड्यांच्या मांडणीने काही क्षणात कोपरा गाठला !

दादांचा स्वच्छता -टापटीप हा अंगभूत गुण घेण्यासारखा आहे . मी मजेत म्हणतो ‘ जसे भारतरत्न स्व. वाजपेयींनी साहेबांना विरोधी बाकावर असूनही देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली तशी दादांवर पक्षभेद बाजूला सारून एखादी स्वच्छता अभियानाची जबाबदारी दिली तर ते हा भारत ‘ स्वच्छ आणि सुंदर भारत ‘ करतील ! ‘ कारण स्वच्छता ही त्यांची सवय नव्हे तर जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहे ! स्वच्छतेच्या ह्या मराठमोळ्या ॲम्बॅसडरला आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!

लेख :- सतीश ज्ञानदेव राऊत
२२ जुलै , २०२१

Most Popular

To Top