मुख्य बातम्या

आबासाहेबांच्या जाण्याने राजकारणातली शेवटची सभ्यता आणि नितिमत्ता गेली !

आबासाहेबांच्या जाण्याने राजकारणातली शेवटची सभ्यता आणि नितिमत्ता गेली !

दत्तकुमार खंडागळे, संपादक वज्रधारी, मो. 9561551006

सांगोल्याचे शेकापचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. गेले काही दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. गणपतराव देशमुख शतक पुर्ण करतील असे वाटत असताना वयाच्या पंच्चानव्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या जाण्याने राजकारणातली शेवटची सभ्यता, नितिमत्ता व नैतिकता गेली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान-थोर कार्यकर्त्यांनी फोडलेले हंबरडे आणि टाहो आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख हे व्यक्तीमत्व किती मोठे होते याचा प्रत्यय देणारे होते. जमिनीच्या खाली दहा फुट रूजलेला व आभाळाला भिडलेला हा माणूस जे जीवन जगला आहे ते अलौकीक आहे. राजकारणासारख्या वलयांकीत प्रांतात असूनही त्यांनी जीवनातली नितीमुल्ये, वैचारिक अधिष्ठान कधीच सोडले नाही. सत्तेसाठी, पदासाठी कधीच वैचारिक व्यभिचार केला नाही. तब्बल अकरावेळा निवडूण येवून व दोन वेळा मंत्री होवूनही त्यांचे पाय जमिनीवरून हलले नाहीत. त्यांच्या व्यक्तीमत्वात कधी माज, घमेंड, गर्व किंवा राजकारणात फोफावलेला झगमगाट दिसला नाही. अतिशय नम्र, संयमी, साधे व्यक्तीमत्व असलेले आबासाहेब वंचितांचा, शोषितांचा व दुष्काळा जनतेचा आवाज होते. ते महाराष्ट्राचे लालबहाद्दूर शास्त्री होते. त्यांचे व्यक्तीमत्व तामिळनाडूचे दिवंगत नेते कामराज आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांचे आठवण करून देणारे होते. सध्या सकाळी एका पक्षात असणारा नेता संध्याकाळी दुस-या पक्षात असतो. सत्तेसाठी, पदासाठी कुणाचेही तळवे चाटतात, कशाही कोलांटउड्या मारतात. या पक्षातून त्या पक्षात माकड उड्या मारतात. त्यांचा विचारांशी, भूमिकांशी, तत्वांशी काही संबंध नसतो. या लोकांचे राजकारण बाजारबसवीपेक्षा उथळ झाले आहे. कुणी कुणालाही डोळा मारते, सोबत घेवून जाते. रात्री एका पक्षात असलेला पहाटे तिस-याच सोबत शपथ घेतो. जनतेला मुर्ख ठरवून, वेडे ठरवून, फाट्यावर मारून राजकीय बाजार भरवला जातोय. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हेच समिकरण सर्वत्र रूजले आहे. अलिकडे तमाम दोन नंबर धंदे करणारे राजकारणात आलेत. विकास योजनांच्या टक्केवारीवर डल्ला मारत सरकारी पैसा आणि व्यवस्था खिळखिळी करणारी ठेकेदारीतली जमात राजकारणात प्रस्थापित झाली आहे. ठेकेदार राजकारणी झाले आहेत. या शिवाय मटकाबुकी, वाळूचोर, दलाल, सावकार राजकारणात प्रस्थापित झाले आहेत. आपल्याच देशाला, आपल्याच लोकांना घोडे लावणारे, लुटणारे नेते झाले आहेत. एखादा सरपंच झाला तरी हातात सोन्याचे कडे, गळ्यात सोन्याची मोठाली चैन, बुडाखाली महागड्या गाड्या असा झगमगाट दिसून येतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आबासाहेबांच्या पिढीतले अनेक राजकारणी नितीमुल्ये, तत्वे जपत आणि जगत होते. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना “दुकानाची उधारी भागवायला पैसे पाठवा !” असे पत्र त्यांची पत्नी वेणूताई त्यांना पाठवायची. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीला किराणा मालाच्या दुकानाची उधारी भागविण्यासाठी यातायात करावी लागे. आता याबाबत न बोललेलं बरं. आत्ताचे आमदार-खासदारच नव्हे तर सरपंच, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि त्यांचा हरामखोरीचा झगमगाट डोळे दिपवणारा असतो. त्यांच्या शेंबड्या पोरांच्या बुडाखाली साठ-साठ लाखाच्या गाड्या असतात. अख्या गावाचे सातबारे या लोकांच्या नावाने निघतात. अशा दलदलीत गणपतराव देशमुखांसारखे निस्पृह, निस्वार्थी व्यक्तीमत्व म्हणजे आदर्शांचा दिपस्तंभ होता. त्यांच्याकडे बघून जगायला शिकावंं, त्यांच्याकडे बघून जीवनाची पायवाट चालायला शिकावं असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. नेहमी एसटीने प्रवास करणारे गणपतराव देशमुख पाहिले की अजून सगळं संपल नाही. अजूनही राजकारणात तत्वनिष्ठता, वैचारिक अधिष्ठान, नितिमत्ता जीवंत आहे याचे समाधान वाटायचे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे शेकडो किस्से ऐकायला मिळतात. त्यांचे कार्यकर्ते ते किस्से अभिमानाने सांगतात. एकदा त्यांच्या कार्यालयातला फँन नादुरूस्त झाला होता. अनेक वर्षे तो फँन त्यांच्या कार्यालयातच होता. त्यांनी एका कार्यकर्त्याला तो फँन दुरूस्त करायला सांगितले आणि ते कामासाठी बाहेरगावी गेले. ते जेव्हा परत आले तेव्हा कार्यालयात बसवलेला नवा फँन दिसला. गणपतरावांनी त्या कार्यकर्त्याला बोलवून घेतले. त्यांनी तो नवा फँन काढून न्यायला लावला आणि जुणाच फँन त्या ठिकाणी बसवायला लावला. कारण तो जुणा फँन अजून चालत होता, चांगला होता. इतका निस्पृहपणा व साधेपणा जपणारा हा माणूस गेल्याने राजकारणातला शेवटचा आदर्शवाद गेला असे म्हणायला हरकत नाही. काही अपवादात्मक माणसं सोडली तर राजकारणात डाकूंचे आणि दरोडेखोरांचे साम्राज्य पसरले आहे. गणपतराव देशमुखांच्या प्रामाणिकपणावर, साधेपणावर सांगोल्याच्या जनतेने जीवापाड प्रेम केले. तब्बल अकरावेळा त्यांना निवडूण दिले. पंच्चावन्न वर्षे ते आमदार होते. देशात तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री करूणानिधी आणि त्यांच्या नावावर सलग दहावेळा निवडूण येण्याचा विक्रम आहे. निम्मे आयुष्य आमदार म्हणून जगलेला हा माणूस सामान्यांचा, गोरगरीबांचा हक्काचा आमदार होता. आता ही पोकळी कधीच न भरणारी आहे.

Most Popular

To Top