मुख्य बातम्या

पालकमंत्री भरणे यांनी स्वतःच्या शब्दाची किंमत घालवू नये ;सोलापुरातील अहिल्यादेवी स्मारकाचे काम सुरू न झाल्याबद्दल विक्रम ढोणे यांची टीका

पालकमंत्री भरणे यांनी स्वतःच्या शब्दाची किंमत घालवू नये ;सोलापुरातील अहिल्यादेवी स्मारकाचे काम सुरू न झाल्याबद्दल विक्रम ढोणे यांची टीका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकाचे काम मार्च २०२१ पर्यंत सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले होते, मात्र त्यानुरूप काहीही घडलेले नाही. त्यामुळे भरणे यांच्या शब्दाला राज्य शासनात किंमत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याप्रकरणी पालकमंत्री भरणे यांनी स्वतःच्या शब्दाची किंमत घालवून घेऊ नये. महिनाभरात स्मारकाचे भुमीपूजन करून काम मार्गी लावावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.

उद्या, शुक्रवार १३ ऑगस्ट रोजी अहिल्यादेवींची पुण्यतिथी आहे. यासंदर्भाने ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री व सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी निवेदने देऊन याप्रश्नी लक्ष वेधले आहे. गतवर्षी याचदिवशी धनगर विवेक जागृती अभियानाने अहिल्यादेवींचे स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भुमिका घेऊन विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्मारक शासकीय निधीतून करण्याची घोषणा केली, मात्र नंतरच्या काळात ठोस तरतूद झालेली नाही. मंत्री उदय सामंत, पालकमंत्री भरणे यांनी विद्यापीठाला भेटी देऊन स्मारक होणार असल्याच्या मोघम घोषणा मात्र केल्या आहेत. याप्रश्नी ठोस कार्यवाही व्हावी, म्हणून धनगर विवेक जागृती अभियानाने सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभुमीवर, दि. २५ जानेवारी २०२१ रोजी बेमुदत उपोषण केले होते. त्यादिवशी रात्री पालकमंत्री भरणे यांनी आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मार्चअखेर स्मारकाचे काम सुरू करण्याचा जाहीर शब्द दिला होता. त्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले. त्यांच्या आश्वासनानुसार अधिकचे चार महिने गेलेतरी अजून स्मारकाचे काम मार्गी लागलेले नाही, ही बाब दुखःद आहे. यातील गंभीर बाब म्हणजे भरणे यांनी दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही, याची जाणीव त्यांना दिलेल्या निवेदनात करून दिल्याचे ढोणे यांनी सांगितले.

याचे आश्चर्य वाटते ः ढोणे

लोकप्रतिनिधी म्हणून दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर मतदारसंघात शेकडो कोटींची कामे सुरू आहेत. कोणताही निधी कमी पडणार नसल्याची विधाने ते सातत्याने करत असतात. मात्र सोलापुरचे पालकमंत्रीपद असूनही अहिल्यादेवींच्या स्मारकाला ते तीन – चार कोटींची तरतूद का करून घेऊ शकत नाही, याचे आश्चर्य वाटते. याप्रश्नी त्यांचे प्रयत्न कमी पडत असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

Most Popular

To Top