लोककलावंत सुरेखाताई पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज लोककलावंत सुरेखाताई पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. तसेच यावेळी मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्व नवीन सदस्यांचे अजितदादांनी पक्षात स्वागत केले.
तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचना अजितदादांनी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे आणि युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांना केली. मनोज व्यवहारे यांच्या पुढाकाराने आजचा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना अजितदादा म्हणाले की, “सुरेखाताईंचे मंचावरील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्य सरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतरही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे सर्व जातीधर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहीजे, ही आदरणीय शरद पवार साहेबांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल, त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्था, स्थनिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.”