“ते” खेडेकर ते “हे”खेडेकर ; विस्मयकारक प्रवास !
- ब्रह्मा चट्टे
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी काळात राजकिय वाटचाल करताना भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची भूमिका मांडली. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकरांनी “मराठा मार्ग” या मासिकांमध्ये संपादकिय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी राजकीय भूमिकेबाबत उहापोह केला आहे. अर्थातच महाराष्ट्रात या भूमिकेने खळबळ माजली नसती तर नवल वाटले असते.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांबाबत महाराष्ट्रामध्ये नव्याने कोणाला ओळख करून द्यायची गरज नाही. मराठ्यांचे मन, मेंदू, मस्तक, मनगट ज्यांनी एका विधायक विचारधारेकडे वळवले ती संघटना म्हणजे मराठा सेवा संघ !
1 सप्टेंबर 1990 रोजी अकोला या ठिकाणी मराठा सेवा संघाची स्थापना करण्यात आली. मराठा समाजातील अधिकाऱ्यांची एक संघटना म्हणून या संघटनेकडे सुरुवातीला बघितलं जात होतं.
पुढे काळानुरूप विविध कक्षाची स्थापना या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. एकूण ३३ कक्ष सध्या कार्यरत आहेत. सळसळत्या रक्ताच्या तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड हा कक्ष स्थापन करण्यात आला तर महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड हा कक्ष स्थापन करण्यात आला. शिक्षकांसाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पत्रकारांसाठी तानुबाई बिर्जे पत्रकार कक्ष, राजकीय भूमिकेसाठी शिवराज्य पक्ष, साहित्यिकांसाठी संतसूर्य तुकाराम साहित्य परिषद आदी विविध कक्षाच्या माध्यमातून सेवा संघ विधायक काम करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेचा घोळ मिटवण्यासाठी शासनाला समिती नेमण्यास मराठा सेवा संघाने भाग पाडले. शासनाच्या समितीच्या निर्णयनुसार तारीख कि तिथी हा घोळ मिटून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये 19 फेब्रुवारीला साजरी होण्याचे श्रेयही मराठा सेवा संघालाच जाते.
मराठ्यांसह पर्यायाने बहुजन समाजाचं सर्वाधिक नुकसान हे धार्मिक गुलामगिरीने केले आहे. हिंदू धर्मातील कर्मकांड, चालिरीती, विधी, व्रतवैकल्य शोषण होते. त्याचबरोबर मराठ्यांना शुद्राची वागणुकी मिळते. त्यातून मराठा बहूजनांची सुटका करण्यासाठी १२ जानेवारी २००५ रोजी जिजाऊ जन्मोत्सवात शिवधर्माची स्थापना करण्यात आली. दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बहुजन बांधव बुलढाणा जिल्ह्यातील “शिंदखेडा राजा” येथे येत असतो. या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ही ग्रंथ विक्रीतून होते. बहुजनांचा मेंदू सुपीक करणाच काम याद्वारे होते.
मराठा सेवा संघाने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं ते संभाजी ब्रिगेडने पुण्यातील
भांडारकर प्राच्यविद्या मंदिर संस्थेवर
केलेल्या हल्ल्यानंतर ! अर्थात संभाजी ब्रिगेडने जे केलं ते समर्थनीय होतं. कारण विकृती अशाच ठेवावे लागतात. त्यात वावगं काहीच नाही. यानंतर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड नावाचं वादळं निर्माण झालं. त्याच वेळेस संभाजी ब्रिगेडने राजकीय भूमिका घेत पक्षाची स्थापना केली असती आणि निवडणूक लढविली असती तर कदाचित संभाजी ब्रिगेडचे दहा-पंधरा आमदार तरी महाराष्ट्रात निवडून आले असते अशी परिस्थिती होती. पण त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने राजकिय भूमिका घेतली नाही. पुरोषत्तम खेडेकरांनी ’ज्यांना राजकिय पक्षात काम करायचं आहे, त्यांना शिवराज्य पक्षात काम करावं’, असा आदेश दिला. शिवराज्य पक्षाचा प्रयोग स्पशेल अपयशी ठरला. पुढे तो प्रयोग मराठा सेवा संघाला गुंडाळावा लागला.
सेवा संघाचा सगळ्यात दमदार कक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पुढे संभाजी ब्रिगेडची २ शकले झाली. राजकीय भूमिका की सामाजिक भूमिका या वादात संभाजी ब्रिगेडचे दोन गट झाले. एक गट प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्रात काम करतोय तर एक गट मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कार्यरत आहे. सामाजिक संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे उघडपणे राष्ट्रवादीचे समर्थन करतात. विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, पुन्हा तटस्थ असा गोंधळलेली स्थितीत प्रविण गायकवाड यांचीही वाटचाल सुरूच आहे. असो लेखाचा विषय तो नाही. मुळ मुद्द्यांवर येवूयात.
अर्थात मराठा समाजातील राजकीय घराणेशाहीवर टीका करणाऱ्या पुरूषोत्तम खेडेकरांनी मात्र संभाजी ब्रिगेडच्या महासचिवपदी आपल्याच पुत्राला विराजमान केलं. हा एक वेगळाच विरोधाभास आहे. सौरभ खेडेकर हे सध्या राजकीय संभाजी ब्रिगेडचे महासचिव आहेत. अर्थात त्यांना हे पद देण्यासाठी खेडेकरांनी कोणता निकष लावला आहे हे तेच जाणोत.
‘मराठा समाजाचे सर्वाधिक नुकसान जर कशामुळे झालं असेल तर ते राजकीय महत्वकांक्षेमुळे, ‘ मराठ्यांनी सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकांमध्ये आपली सगळी शक्ती खर्ची घातली आणि त्यामुळे मराठ्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची मांडणी मराठा सेवा संघाने केली. मराठा तरुणांनी राजकारणाचा नाद सोडत डोक्याच्या मालिशपासून बुटपालीसपर्यंत सगळ्या प्रकारचे व्यवसाय करायला हवे, असे आव्हान पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.
राजकारणा व्यतिरिक्त प्रशासन, साहित्य, कला, क्रीडा, संगीत, व्यवसाय, प्रसार प्रचार माध्यम, चित्रपट क्षेत्रामध्ये मराठ्यांचं प्रतिनिधित्व नगण्य आहे. राजकारण सोडून या क्षेत्रांमध्ये मराठ्यांनी लक्ष द्यायला हवं, अशी मांडणी करणारे “ते” पुरूषोत्तम खेडेकर अचानक आपल्या भुमिकेपासून फारकत घेत आहेत. फारकत घेताना त्यांनी केलेली तक्रार मजेशिरच आहे.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या मुशीत तयार झालेल्या अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात आपलं बस्तान बसवले आहे. त्याची यादी भली मोठी आहे. स्थानिक ते राज्य पातळींवर सध्या सत्तेत असलेल्या पुर्वाश्रमी सेवा संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्त्यांची यादी भली मोठी आहे. विस्तारभयास्तव त्याच्या खोलात सध्या जात नाही. असो.
आज पुरुषोत्तम खेडेकर “हे” भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा आग्रह करत आहे. आपल्या पदाधिकाऱ्यांना तसं प्रकारचा त्यांनी आवाहनही “मराठा मार्ग” या मासिकाद्वारे केलं आहे. भारतीय जनता पक्ष हा अर्थातच आरएसएसची एक विंग आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधामध्ये आहे, असं असताना पुरूषोत्तम खेडेकर हे भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडतात.
पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी रेखाताई खेडेकर या भारतीय जनता पक्षाच्या आमदार होत्या. त्यावेळेस ही अनेक वेळा पुरुषोत्तम खेडेकरांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय सेवक संघावर अनेक वेळा घणाघाती टीका केली आहे. आरएसएसचे सरसंघचालक के. सुदर्शन यांना सोलापूर येथे चप्पल फेकून मारली म्हणून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महेश चव्हाण याचा पुरुषोत्तम खेडेकर यांनी जाहीर सत्कार केला आहे. या कार्याबद्दल महेशला “शिवक्रांतीवीर” असा किताब ही पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला आहे. आरएसएस भाजपविरोधी खेडेकर यांनी केलेल्या गोष्टींची अनेक उदाहरणे देता येतील. त्याचबरोबर खेडेकरांच्या पुस्तकांवर बंदी घालावी म्हणून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधीमंडळामध्ये गोंधळ घातला आहे.
‘पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं समीकरण झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडला राजसत्तेत आणावं लागेल,’ असं स्पष्टीकरण खेडेकरांनी मराठा मार्गमध्ये लिहिलेल्या लेखात दिले आहे. या लेखात संभाजी ब्रिगेडने भारतीय जनता पक्षासोबत जायला हवाय याच कारण देताना आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते भारताच्या इतिहासातील राजकिय तडजोडी, पक्षीय आघाड्या, समिकरणे, विरोधी विचारांच्या पक्षात झालेले साटेलोटे यांची अनेक उदाहरणे पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहेत. अर्थात खेडेकरांनी दिलेलं हे लंगडे समर्थन मानले तरी प्रश्न कायम उरतो तो म्हणजे “मराठ्यांनो राजकीय महत्त्वाकांक्षा गुंडाळून ठेवा” या मराठा सेवा संघाच्या कानमंत्राचं करायचं काय ? त्याचबरोबर
” ब्राह्मण्यवाद” ज्यांचा पाया आहे, त्यांच्यासोबत वाटचाल करताना ब्राह्मण्यवादाला “हे” खेडेकर विरोध कायम कसा ठेवणार ?
मराठा सेवा संघाची वाटचाल सुरूच राहील यात शंका नाही, मात्र संस्थापक “ते” खेडेकर ते “हे”खेडेकर यांचा विस्मयकारक प्रवास सुरूयं हे निश्चित !
फोटो – मासिक मराठा मार्गचे मुखपृष्ठ