मुख्य बातम्या

मेंढपाळांच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? अ‍ॅड असीम सरोदे

मेंढपाळांच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार?

अवकाळी पावसाने राज्यात 3500 पेक्षा जास्त शेळ्या- मेंढ्या दगवल्या आहेत. पावसात भिजून थंडीने अनेक गाई-म्हशी मेल्या आहेत.

महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील 29 तालुके व 199 गावांना पावसाचा फटका बसला असल्याचे राज्य सरकारच्या माहितीवरून दिसते.

रायगड, अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा या चार जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला.

पाऊस व त्यानंतर शरीराला झोंबणारी गार हवा जनावरांना सहन झाली नाही. नोव्हेंबर पासून मेंढ्याची लोकर काढण्यात येते त्यामुळे त्यांना थंडीचा जास्त त्रास झाला व त्या मेल्या. मेंढपाळांकडे बकऱ्या-मेंढ्यांसाठी तात्पुरते छप्पर असलेला निवारा असतो त्यामुळे सुद्धा डायरेक्ट अंगावर पडणारा पाऊस व थंडी यांनी त्यांचा बळी घेतला. बकऱ्या व मेंढ्या पालन, गाई-गुरे पालन करणाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.

धनगरांच्या हक्कांसाठी दिखाऊ बोलणारे केवळ त्यांच्या राजकीय बॉस च्या सांगण्यानुसार विषय घेतात, बडबड करतात असे धर्मांध राजकीय पक्षांना शरण गेलेले नेते आता कामाचे नाहीत. आज धनगरांच्या जीवन जगण्याचे नवीन प्रश्न व समस्या तयार झाल्या आहेत त्याकडे त्यांनी कुणी एक शब्द काढला नाही, कुणाचे लक्ष नाही. आता माझी पोष्ट वाचून कदाचित बोलायला लागतील तर ते सुद्धा चालेल.

पशु संवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ धनंजय परकाळे यांना माझी विनंती आहे की धनगरांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करावी. पशु संवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी यावेळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी निदान रायगड, अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांना भेटी देऊन मेंढपाळांचे प्रश्न समजून घ्यावेत. त्यांनी तयारी दाखविली तर आम्ही कोणत्याही एका जिल्ह्यात राज्यातील प्रमुख मेंढपाळांना एकत्र बोलावू. भटक्या समाजाचे दुःख, अडचणी समजून घेणे आवश्यक आहे.

बाकी गाई वाचवा म्हणणारे सगळे मजेत आहेत. पण जे प्रत्यक्ष गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या, घोडे, कुत्रे, मांजरे यांच्या सोबत जीवन जगतात त्यांना कुणीच मदत करीत नाही.

©-अ‍ॅड असीम सरोदे

Most Popular

To Top