मुख्य बातम्या

दिंद्रुड – दिल्ली – डी लिट : शिव छत्रपतींची प्रेरणा : ओमप्रकाश शेटे

दिंद्रुड – दिल्ली – डी लिट : शिव छत्रपतींची प्रेरणा

आज माझ्या आयुष्यातील ‘सोनियाचा दिवस’ म्हटलं तर वावगं होणार नाही. ज्यांना मी आदर्श मानतो अशा लोकनेत्याच्या उपस्थितीत मला ‘डॉक्टरेट’ प्रदान करण्यात आली. शिव छत्रपतींच्या प्रेरणेनेच ‘दिंद्रुड – दिल्ली – डी लिट’ असा मोठा पल्ला गाठता आला. डॉक्टरेट स्विकारतांना आत्यंतिक आनंद झाला परंतु हा नेत्रदीपक सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी काही जिवाभावाची माणसं आपल्यात नाहीत याची हुरहूर मनाला लागून गेली.

‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिमेड टू बी युनिव्हर्सिटी’ यांच्या वतीने आज ‘डॉक्टरेट’ (डी. लिट) ही पदवी मला बहाल करण्यात आली. या ऐतिहासिक पदवीदान समारंभास मा. मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.भागवतजी कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, इन्स्टिट्यूटचे चांन्सलर सुरेशजी भोसले, मा.मृगेश रुद्राप्पा निराणी आदी मान्यवर उपस्थित होते. हजारो कराडकारांच्या साक्षीने हा भव्यदिव्य, देखणा व नेत्रदीपक सोहळा पार पडला.

दिंद्रुड सारख्या ग्रामीण भागात व्यापारी कुटुंबात माझा जन्म झाला. परंतु पैसे जमवण्यापेक्षा माणसं जोडण्याचा छंद बालपणीच जडला. सार्वजनिक जीवनात काम करत असतांनाच आश्विन जाधव या मित्राला यमराजच्या तावडीतून वाचविण्याच्या प्रयत्नात नकळत आरोग्य क्षेत्रात ओढला गेलो. दुखीतांचे दुःख वाटून घेण्यात आनंद वाटू लागला. गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी धडपड करत असतांना संवेदनशील अशा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहवासात आलो आणि खऱ्या अर्थाने माझ्या आरोग्ययज्ञास प्रारंभ होऊन रुग्णसेवेची चळवळ गतिमान झाली व तीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. . ”कोणताही रुग्ण पैशाच्या अभावी मरता कामा नये” हा देवेंद्रजींचा मंत्र घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून आकाशाएव्हढे काम उभा केले याला इतिहास साक्षी आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून साडेचार वर्षात तब्बल 23 लाख लोकांना आरोग्यासाठी मदत करतांना अनेकांना ‘जीवनदान’ मिळाले. मुख्यमंत्री वैधकीय कक्ष, व धर्मादाय कोठ्यातून गरजूंना उपचारासाठी जवळपास 1700 कोटी रुपयांचे उपचाराकरीता मदत मिळवून देण्यात आली. आजपर्यंत कोणत्याही सरकारच्या काळात एवढी मोठी मदत गरिबांच्या उपचारासाठी खर्च झाली नाही हा विक्रम केवळ संवेदनशील मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पाठबळावरच करता आला यात शंका नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुर्गम – अतिदुर्गम भागात जाऊन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले.
रुग्णसेवेचा ध्यास व त्यासाठीच शेवटचा श्वास हे ब्रीद घेऊन देवेंद्रभाऊंनी मला देशाच्या राजधानीत पाठवले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारतीताई पवार यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून काम करतांना राज्यात केलेल्या सेवेचा अनुभव कामी येईल. मा. देवेंद्रजींची साथ व पाठबळ आहेच. तिथेही मी महाराष्ट्राची छाप सोडल्याशिवाय राहणार नाही.

दिंद्रुड ते दिल्ली हा खडतर प्रवास करतांना सेवा, समर्पण व कामाप्रति निष्ठा ठेऊन काम केले. अर्थात देवेंद्रभाऊ यांच्यामुळेच हे शक्य झाले हे वेगळे सांगायला नको. त्यातच आज ‘डी-लिट’ मिळाल्याने केलेल्या मेहनतीचे चीज झाले. काम करतांना जेष्ठबंधू डॉ.शिवरत्न शेटे यांचे अमूल्य मार्गदर्शन व अर्धांगिनी सौ.शिल्पा यांची समर्थ साथ मिळत असते. ते ही माझ्या यशाचे माझ्या इतकेच भागीदार आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य हितचिंतकांचा आहे.
मला मिळालेला ‘डॉक्टरेट’ हा बहुमान माझे सर्वोसर्वा असलेल्या ‘देवेंद्रभाऊंना समर्पित करतो.
धन्यवाद……

 

Most Popular

To Top