मी फक्त सत्ताधारी नेत्यांवरच आरोप करणार!
किरीट सोमैय्या यांनी भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांकडे डोळेझाक करणार असल्याची पत्रकार परिषदेत दिली कबुली
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई दौऱ्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमैय्या यांची अंबाजोगाई येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.
धनंजय मुंडे यांच्यावर एका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या सोमैय्या यांचे बीड जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या घोटाळ्यांकडे काही पत्रकारांनी लक्ष वेधले, त्या घोटाळ्यांमधील पीडित देखील सामन्यात शेतकरी, गोरगरीब असल्याचेही लक्षात आणून दिले, मात्र किरीट सोमैय्या यांनी त्या प्रश्नांना बगल देण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसले.
अखेर भाजप नेत्यांच्या घोटाळ्यावर का बोलत नाहीत, असे स्पष्टच विचारल्यावर सोमैय्या यांनी आपण मागील दोन वर्षात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच आरोप करणार आहोत, भाजपच्या नेत्यांचे कुणाचे काही घोटाळे असतील तर ते मला माहित नाही, माझ्याकडे राज्यातून तक्रारी येतात मात्र त्या भाजप नेत्यांच्या नसतात, असे म्हणत भाजप नेत्यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणार असल्याची कबुलीच सोमैय्या यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.