महाराष्ट्र

खासदार जलील यांच्या आव्हानाला प्रतिसाद ! महाराष्ट्रातील ठेवीदारांनी कोट्यावधी रुपये पतसंस्थेतुन काढल्याने सहकार क्षेत्र हादरले..

२ कोटी सभासद – ११० लाख कोटी डिपॉझिट – १३४१२ सहकारी पतसंस्थामधील गोरगरीबांच्या पैशांची जबाबदारी सरकारने घ्यावी – खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद : सहकारी बँका व पतसंस्थांमधील ठेवीदारांचा प्रत्येक रुपया सुरक्षित आहे; आणि जर ते बुडाले तर सरकार ६ महिण्यांच्या आत व्याजासह मुद्दल परत करेल ही घोषणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला खासदार इम्तियाज जलील यांनी अल्टिमेटम दिला होता. परंतु शासनाने गोरगरीब ठेवीदारांच्या संदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याने खासदार जलील यांनी सहकारी बँका व पतसंस्थेमधून ठेवीदारांनी आपआपले कष्टाचे पैसे काढण्याचे आवाहन केले होते. ठेवीदारांनाही पैसे सुरक्षित नसल्याचे लक्षात येताच त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील पतसंस्थेमधून आपआपले पैसे काढण्यास सुरवात केल्याने संपुर्ण सहकार क्षेत्र हादरले.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुंबई आणि सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या सर्व सदस्यांनी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेवुन महाराष्ट्रातील सहकार चळवळ व विशेषत: पतसंस्था चळवळ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याची एकमताने मागणी करुन विनंती केली. परंतु जेव्हा पर्यंत राज्य शासन गोरगरीबांचे पतसंस्थेमधील पैशाची जबाबदारी घेत नाही; तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सहकार क्षेत्राला सहकार्य न करता उलट गोरगरीबांकरिता आंदोलन तीव्र करण्याची ठाम भुमिका खासदार इम्तियाज जलील फेडरेशन समोर घेतली.
सरकारने संपूर्ण सहकार क्षेत्रच वार्‍यावर सोडल्याने महाराष्ट्रातील सहकारी बँका व पतसंस्था गोरगरीब, कष्टकरी, वयोवृध्द नागरिक तसेच शेतकरी बांधवाच्या आयुष्याची जमापुंजी घेवुन पळत आहे. सरकारचा सहकार क्षेत्रावर नियंत्रण न राहिल्याने सहकारी बँका व पतसंस्थामधील संचालक मंडळ ठेवीरांच्या कोट्यावधी रुपयांची बिनधास्तपणे खुलेआम लूट करत आहे; गोरगरीबांची होणारी लूट थांबवणे सरकारची संपूर्ण जबाबदारी असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याचे समोर आल्याने सर्व ठेवीदार चिंताग्रस्त होवुन त्यांना अश्रु अनावर होत आहेत. पतसंस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाखांमध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून मागणी करूनही ठेवीदारांना पतसंस्थेकडून पैसे देण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. ठेवीदार पतसंस्थेच्या शाखांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापकांकडून ठेवीदारांना तारीख देऊन तुम्हाला पैसे अमुक तारखेला मिळतील असे सांगून केवळ भूलथापा दिल्या जात होत्या. दुर्देवी बाब म्हणजे दोन ठेवीदाराने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली.
फेडरेशनच्या सदस्यांनी खासदार जलील यांची भेट घेवून दिलेल्या पत्रात नमूद केले की, महाराष्ट्रात सध्या १३४१२ नागरी सहकारी पतसंस्था आहे व ७५२८ पगारदार पतसंस्था आहे यामध्ये एकूण २ कोटी सभासद आहे. व ११० लाख कोटी डिपॉझिट व ८० लाख कोटी कर्ज वितरण केलेले आहे. साधारणत: अडीच ते तीन लाख कर्मचारी व सहा लाख पिग्मी कलेक्शन एजंट असा मोठा परिवार आहे. पण एखाद्या संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सहकार चळवळ बदनाम होत आहे. आणि त्यासाठी पूरक वक्तव्य सुध्दा केली जात आहेत. त्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन असे महत्वपूर्ण चळवळ धोक्यात येण्याचा संभव निर्माण होतो. दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई अवश्यक केली गेलीच पाहीजे यामध्ये कुठलेही दुमत नाही.
तसेच एखाद्या आदर्श सारख्या प्रकरणामुळे ही चळवळ बदनाम होऊ नये किंवा लोकांच्या विश्वासार्तेला तडा जाऊ नये यासाठी सहकार चळवळ वाढवण्याचा व टिकवण्याचा प्रयत्नासाठी आपला अमूल्य सहकार्याची व प्रयत्नाची गरज असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

Most Popular

To Top