मुख्य बातम्या

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

सहा महिन्यात कोसळलेल्या उड्डाणपुलावरून भाजपवर साधला निशाणा

अकोला : ‘अकोल्याच्या जनतेचे कर स्वरूपात दिलेल्या शेकडो कोटी रुपयांची फळे सहा महीने सुद्धा चाखता आली नाहीत’ असे ट्विट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला अकोला शहरातील उड्डाणपूल सहा महिन्याच्या आत खचला आणि गेले 7 महीने झाले तरी त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूल अवघ्या सहा महिन्याच्या आत खचला. आता गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू अद्याप तो उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

‘मी महिन्यातून दोनदा अकोल्यात येतो आणि प्रत्येक वेळी किमान ५ दिवस तरी राहतो. प्रत्येक वेळी माझे वाहन अशोक वाटिका चौकातून जाते तेव्हा मला अपेक्षा असते की कोसळलेला उड्डाणपूल दुरुस्त होऊन कार्यान्वित झाला असेल. पण, मी प्रत्येक वेळी निराश होतो.’ असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. अशोक वाटिका चौक, अमरावती मार्ग व टॉवर चौकात पुलावरून ‘रॅम्प’ मार्ग ठेवण्यात आला, तर बसस्थानक चौकात भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आता १९ डिसेंबर २०२२ रोजी खचला. या मार्गाखालून गेलेली ६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव बाहेर येऊन वाहून गेला. परिणामी, हा मार्ग बंद करावा लागला. गेल्या 8 महिन्यांपासून या पुलाचे दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. अद्यापही हे कार्य पूर्ण झाले नसल्याने पुलावरून अमरावतीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

‘या विलंबासाठी कोण जबाबदार आहे नगरसेवक, आमदार की खुद्द केंद्रीय मंत्री यावर चर्चा करायची नसून मला एवढंच दिसतंय की, अकोल्यातील जनतेने कर स्वरूपात भरलेल्या शेकडो कोटींची फळे त्यांना ६ महिने सुद्धा चाखता आली नाहीत, कारण केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झाल्याच्या ६ महिन्यांतच पुल कोसळला.’ असे म्हणत त्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामातून जनतेच्या पैशाचा कसा अपव्यय सुरू आहे याकडे लक्ष वेधले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हे ट्विट म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Most Popular

To Top