मुख्य बातम्या

चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर ३ डिसेंबर १७७६ जन्मदिन विशेष

चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर ३ डिसेंबर १७७६ जन्मदिन विशेष

महाराजा यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. ):- चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) हे होळकर साम्राज्याचे एकही युद्ध न हारणारे एकमेव सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले सम्राट झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूध्द सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव सम्राट अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणारे शेवटचे मोठे राज्य होते.
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले.
अश्याच शूर क्रांतीकारकांपैकी एक होते यशवंतराव होळकर.
” शिवराया मागं होळकर फक्त ऐकला
महाराष्ट्रध्वजा अति उंच उभारुनी गेला
नव इतिहासाचा नवा सत्य दाखला
अमरनें दिला ! मुजऱ्याला चला…
यशवंतराव होळकर बोला,
चांगभल बोला !!!!! ”
यशवंतराव होळकर एका अश्या शूर योद्ध्याचं नाव आहे ज्यांची तुलना प्रसिद्ध इतिहासशास्त्री एन.एस. इनामदार यांनी ‘नेपोलियन’ सोबत केली आहे. ते मध्यप्रदेशातील मालवा रयतेचे महाराज होते. यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ साली झाला. त्यांच्या पित्याचं नाव तुकोजीराव होळकर होते. त्यावेळी होळकर समाजाचा प्रभाव खूप होता. पण त्यांची ही समृद्धी काही लोकांच्या डोळ्यांत खुपत होती. त्यांच्यापैकीच एक ग्वालियरचे शासक दौलतराव सिंधिया हे देखील होते. होळकर साम्राज्याची ही समृद्धी त्यांना बघवत नव्हती म्हणून त्यांनी यशवंत रावांच्या मोठ्या भावाचा म्हणजेच मल्हारराव यांच्या हत्येचा कट रचून त्यांना ठार केले.
मोठ्या भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूने यशवंतराव हळहळले, पण त्यांनी लवकरच स्वतःला सावरले,
२५ ऑक्टोबर १८०२ मध्ये झालेल्या युद्धात त्यांनी पुण्याच्या पेशवा बाजीराव द्वितीय आणि सिंधिया यांच्या संयुक्त सेनेला नमवले. तेथे खरी यांच्या शौर्याची पताका फडकली.
हडपसरची लढाई
पेशव्याने शेवटच्या विनंतीलाही मान दिला नाही, चर्चेची तयारी दाखवली नाही यामुळे युद्ध अटळ झाले. शिंद्यांची व अन्य सरदारांची अजस्त्र फौज वानवडीजवळ जमा झालेली होतीच. यशवंतरावांनीही आपल्या सेनासागरासह हडपसर गाठले.
पेशव्यांच्या बाजुने सर्वाधिक भरणा अर्थातच शिंद्यांच्या सैन्याचा होता. जवळपास सव्वा लाखाचे घोडदळ व पायदळ आणि विलायती कंपु व जवळपास ८० तोफा शिंद्यांनी मैदानात उतरवल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी भाडोत्री पेंढारी सैनिकही या युद्धात सामील करुन घेतले होते. पेशव्यांची रडतराव ६०००ची फौजही त्यांच्या दिमतीला होतीच.
होलकरांची बाजु अर्थात भक्कम होती. त्यांचे घोडदळ भारतातील सर्वोत्क्रुष्ठ मानले जात असे. होळकरांचे घोडदळ, पायदळ व तोफदळासहितचे एकुण सैन्य होते १४४०००. (सर जदुनाथ सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार. प्रत्यक्षात ते ८० ते ९० हजार एवढेच असावे असे अन्य काही साधने सुचवतात.) यशवंतरावांची सर्वात जमेची बाजु म्हणजे प्रत्येक सैनिकाचा, मग तो पठाण असो कि पेंढारी, हिंदु असो कि देशी मुसलमान, प्रत्येकाचा आपल्या सेनापतीवर पराकोटीचा विश्वास होता. प्रत्येक युद्ध शिपायाप्रमानेच त्यांचा सेनानी त्यांच्या खांद्याला खांदा लावुन लढला होता. त्यामुळे शिपाईगड्यांत असलेली मित्रत्वाची भावना निर्माण झालेली होती.
या उलट शिंदेंचे होते. स्वत: दौलतराव शिंदे अद्याप उत्तरेतच होते. होळकर दक्षीनेत गेल्याचा फायदा तो उत्तरेत बसुन घेत होता. स्वाभाविकच त्याच्या सैन्यात कितीसा जोर असणार?
२५ आक्टोंबर १८०२.
या युद्धाकडे सा-या हिंदुस्तानचे लक्ष लागुन राहिलेले होते. पेशव्यांच्या पुण्यावर निजामानंतर कोणीही स्वारी केल्याचे धाडस दाखवलेले नव्हते. दुर्बळ झाली असली तरी अजुन मराठेशाही पराक्रमी सरदारांमुळे जीवंत होती. येथे दोन बलाढ्य सरदार अस्तित्वाचा लढा लढणार होते.
युद्धाची व्युहरचना झाली होती. शिंद्यांच्या बाजुने (पश्चिम) कुल्ब अली खानच्या नेत्रुत्वाखालील अंबाजी इंगळेच्या सात बटालियन, क्यप्टन डेव्जच्या नेत्रुत्वाखालील सुदरल्यंडच्या चार बटालियन्स, डाव्या बाजुला सदाशिव भास्कर बक्षीच्या अधिपत्याखालील घोडदळ, आणि काही अंतरावर पेशव्याचे सैन्य आणि समोर तोफखान्याची रचना अशी स्थिती होती. या संपुर्ण सेनेचे सेनापत्य बक्षी करत होता.
होळकरांच्या उजव्या बाजुने मिरखानचे घोडदळ व पायदळ, कर्नल हार्डिंगच्या चार ब्रिगेड, विकर्सच्या पाच तर डोडच्या ३ बटालियन्स सज्ज होत्या तर डाव्या बाजुला शहामत खान, फत्तेसिंग माने, मिरखान, नागो शिवाजी शेणवी, भवानी शंकर खत्री (बक्षी)सारखे सेनानी आपापल्या दळाचे नेत्रुत्व करत होते. समोर तोफखाना होता. होळकरांकडे यासमयी जवळपास १०० तोफा होत्या.
स्वत: यशवंतराव घोड्यावर स्वार होवुन आपल्या हुजुरातीच्या कडव्या सैन्यासह उंचवट्याव समोर थांबले होते. तेथुन संपुर्ण रणभुमीचे त्यांना निरिक्षण करता येत होते.
सकाळी साडेनवाच्या आसपास शिंद्यांकडुन प्रथम तोफा धडादल्या. यशवंतरावांनी पुन्हा आदेश दिला, जोवर ते २५ वेळा तोफा डागत नाहीत तोवर आपण युद्ध सुरु करायचे नाही. त्यांनी आपल्या सैन्याची नाहक हानी होवु नये म्हणुन सैन्य जरा मागे सरकावले. शिंद्यांना वाटले शत्रु घाबरला…त्यांना अधिकच चेव चढला. जसे २५ बार होवुन गेले तसे यशवंतरावांनी इशारा केला आणि होळकरांची फौज त्वेषाने शिंदेंच्या सैन्यावर तुटुन पडली.
बाजीराव पेशवा पर्वतीवरुन भरल्या पोटाने (त्या दिवशी दिवाळीचा दिवस होता.) युद्धाचे द्रुष्य काही वेळ पहात होता. नंतर जय झाला कि पराजय याची विचारपुस न करता वा अंतिम निकालाची वाटही न पहाता जो निघाला तो सरळ डोणज्यालाच जावुन धडकला.
इकडे धमासान युद्ध सुरु होते. शिंदेंच्या डी बोईं आणि सदाशिव भास्करने फारच कडवी लढत दिली. रक्ताचे पाट वाहु लागले. मिर खान त्या गर्दीत सापडला…त्याचा घोडा पडला…पण तरीही लढतच राहिला. कर्नल हार्डिंग आपल्या बटालियनसह पुढे आला…मिर खानाला सुरक्षित केले आणि कुल्ब अलीच्या ब्रिगेडला हादरवुन सोडले.
याच वेळीस आतापर्यंत युद्द्धभुमीचे निरिक्षण करणारे यशवंतराव आपल्या कडव्या सैन्यासह युद्धभुमीवर उतरले. झंझावाती वेगाने ते शिंदेंच्या तोपचींवर कोसळले व अनेकांना कंठस्नान घातले. तोफखाना बंद पाडुन मागे असलेल्या कुल्ब अलीच्या घोडदळावर उतरले आणि धुमश्चक्री सुरु झाली. तोवर त्यांच्या हाताला मोठ्या चार जखमा झालेल्या होत्या. तरीही ते शत्रुला सपासप कापुन काढत होते. स्वत: यशवंतराव एवढ्या वीरस्रीने युद्धात उतरल्यानंतर सैन्याला अजुनच त्वेष चढला. काही क्षणांतच युद्धाचा रांगरंग पालटला. शिंदेंचे घोददळ पळत सुटले. पायदळ कसे बसे जीव वाचवायचा प्रयत्न करत मागे हटत राहिले. पेशव्यांची हुजुरात तर कधीच गायब झाली होती.
डी बोई आणि डेव्ज हेच काय ते शिंद्यांकडुन शेवटपर्यंत लढले. त्यांच्या १४०० पैकी ६०० लोक ठार झाले होते. शेवटी त्यांनीही माघार घेतली. चारपैकी ३ युरोपियन अधिकारी ठार झाले. होन्रो नामक एक फ्रेंच अधिकारी वाचला, पण त्याला नंतर वानवडीच्या शिंदेंच्या वाड्यात पकडण्यात आले. फत्तेसिंग मानेंनी पळत्या सैन्याचा पाठलाग करुन पुरती वाताहत केली.
या युद्धात शिंदेंचे ५००० सैनिक ठार झाले तर हजारो जखमी झाले.
यशवंतरावांचा या युद्धात पुर्ण विजय झाला होता.
पुण्याकडे पळालेल्या शिंदेंच्या सैन्याची तर अजुनच फटफजिती झाली. लोक त्यांना प्यायला पाणी देईनात तर खायला अन्न कोठुन? त्यांच्या तोंडावर लोक दारे बंद करत होते. रस्त्यावर कुत्र्यासारखे त्यांना सडावे लागले. एवढी घृणा लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल होती. अनेक वर्ष ते शिंद्यांचा अत्याचार सहन करत होते…आता त्यांना कोणीतरी त्राता भेटला होता…अन्यायाचे पर्व आता दूर होईल अशी आशा त्यांच्या मनात प्रज्वलीत झाली नसेल तरच नवल!
पण दिवाळीचा दिवस असुनही पुण्यात कोनाच्या घरात चुल पेटली नाही हेही खरे.
लोक घाबरलेले होते…
याचे खरे कारण होते खुद्द पेशवाच पळुन गेला आहे ही बातमी संध्याकाळपर्यंत पुण्यात वा-यासारखी पसरली होती…
अनिश्चिततेचे पुरेपुर सावट पुण्यावर पडले होते.
या युद्धातील विजयानंतर यशवंतरावांनी पुणे लुटायची आज्ञा द्यावी असे मीरखानाने सुचवले. यशवंतरावांनी त्याला मनाई तर केलीच पण सर्व सैन्य वानवडीतच थांबेल, कोणीही पुण्याकडे जानार नाही असा आदेशच काढला. “कोणीही पुण्याकडे गेला, एकाही नागरिकाची साधी कवडी जरी लुटली वा स्त्रीयांच्या अब्रुला हात घातला तर त्याचे हात-पाय तोडुन भर रस्त्यात फेकले जाईल…” असा तो कठोर आदेश होता. यशवंतरावांची शिस्त अत्यंत कडक आणि वचक फार मोठा होता. त्यामुळे त्याच्या सैन्याने, विशेशता: पेंढारी व पठाण सैन्याने, निमुटपणे तो हुकुम पाळला. पेशवा कुंजीर व अन्य काही दरबा-यांसह पळुन डोनजे येथे थांबला आहे ही वार्ता यशवंतरावांनाही संध्याकाळपर्यंत मिळाली. ही घटना अनपेक्षीत होती. पेशव्याला तातडीने मदत पाठवायची व पुण्याला परत आणायचा निर्णय त्यांनी घेतला व रसदेसह एक तुकडी डोणज्याला पाठवली. पण तोवर स्वारी पुढे निघुन गेली होती. यशवंतराव आपल्याला पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी सैन्य पाठवत आहे अशी भिती त्याला असावी. पण ते खरे नव्हतेच. पेशव्याकडे आता सैन्यच काय होते? मनात आणले असते तर यशवंतराव त्याला पठाणी तुकड्या पाठवुन खरोखर पकडुन आणु शकले असते. पुढे बाजीराव रायगडावर जावुन पोहोचला. तेथुन त्याने इंग्रजांशी बोलणी चालु ठेवली. त्याला नि:शंकपणे पुण्याला येण्याची अनेक आर्जवी निमंत्रणे यशवंतरावांनी पाठवली, पण बाजीरावाने ऐकले नाही.
या दरम्यान इंग्रजांनी देखील भारतात आपले पाय पसरविण्यास सुरवात केली होती. तेव्हा यशवंतरावांसमोर आणखी एक मोठी आपत्ती येऊन ठेपली. ती म्हणजे भारताला या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे. पण त्या करिता त्यांना इतर भारतीय शासकांच्या मदतीची गरज होती. यासाठी यशवंतराव यांनी नागपूरचे भोसले आणि ग्वालियर येथील सिंधिया या राजपरीवारांसोबत हात मिळविला. त्यांनी या धोकेबाज इंग्रजांना देशातून बाहेर फेकण्याचा निश्चय केला. पण यशवंतरावांच्या जीवनात संकटांची कमी नव्हती. जुन्या वैरापायी भोसले आणि सिंधिया यांनी ऐनवेळी त्यांची साथ सोडली आणि ते एकटेच राहिले त्यानंतर त्यांनी इतर शासकांनाही इंग्रजांविरुद्ध एकजूट होण्याची विनंती केली परंतु कोणीही त्यांचे ऐकले नाही.
अखेर त्यांनी स्वतःच इंग्रजांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. ८ जुन १८०४ ला त्यांनी पहिल्यांदा इंग्रजी सैन्याला पराभूत केले. त्यानंतर ८ जुलै १८०४ साली त्यांनी कोटा येथून इंग्रजांना हद्दपार केले. यानंतर ते निरंतर त्यांच्या कार्यात सफल होत गेले. अखेर ११ सप्टेंबर १८०४ ला ब्रिटीश जनरल वेलेस यांने लार्ड ल्युक यांना पत्र लिहीले की, जर यशवंतरावांना लवकर थांबविल्या नाही गेले तर इतर शासकांसोबत मिळून इंग्रजांनी भारतातून हकालपट्टी करतील..!यशवंतराव आता इंग्रजांसाठी त्यांच्या मार्गाचा काटा बनले होते, त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर हल्ला करविला. या युद्धात यशवंतरावांनी भरतपूरच्या महाराज रणजीत सिंह यांची सोबत घेत एकदा परत इंग्रजांना पराभूत केले. पण महाराज रणजीत सिंह यांनी लोभापायी यशवंतरावांची साथ सोडून इंग्रजांची साथ देण्याचे ठरवले. तेव्हा यशवंतराव हतबल झाले, त्यांना कळेच ना की असे का होत आहे, का कोणी शासक त्यांचा साथ देत नाही?
यशवंतरावांच्या शौर्याची कहाणी आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरायला लागली होती. लोक त्यांच्या पराक्रमी आणि धाडसी व्यक्तिमत्वामुळे खूप प्रभावित झाले, त्यामुळे त्यांचा सन्मानही वाढला. कदाचित याच कारणामुळे त्यांचे जुने वैरी सिंधिया राजघराणे ज्यांची त्यांनी साथ सोडली होती, ते पुन्हा त्यांची साथ देण्यास समोर सरसावले. पण आता यामुळे इंग्रजांची झोपचं उडाली. त्यांना काळजी वाटू लागली की जर यशवंतराव यांच्या सोबत सर्व शासकांनी हात मिळवणी केली तर आपलं काही खरं नाही. म्हणून त्यांनी एक डाव खेळला!
त्यांनी यशवंतरावांशी संधी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून यामुळे त्यांचा फायदा होईल.यावेळी इंग्रजांनी पहिल्यांदा विना अट संधी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी यशवंतराव यांच्याशी संधी करताना त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की, त्यांना जे हवं ते देऊ, त्याचं जेवढ साम्राज्य आहे तेही त्यांना परत करू. फक्त या बदल्यात ते इंग्रजांशी लढणार नाहीत
पण यशवंतराव हे भारत मातेचे खरे सुपुत्र होते. त्यांनी इंग्रजांची ही संधी लाथाडली. त्यांचं केवळ एकच ध्येय होतं. इंग्रजांना भारतातून बाहेर काढणे. त्यांच्या या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी देशातील सर्व शासकांना एकजूट करण्यास सुरवात केली. ते या कार्यात असफल ठरले.
दुसरीकडे त्यांचे एकमेव साथीदार सिंथिया यांनी देखील इंग्रजांची संधी केली. त्यामुळे यशवंतराव आता एकटे पडले. अशा परिस्थितीत आता त्यांना काही मार्ग दिसत नव्हता. म्हणून त्यांनी स्वतःच इंग्रजांवर हल्ला चढवला. इंग्रजांना स्वतःच्या बळावर पराभूत करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली. त्यासाठी त्यांनी भानपूर येथे दारू-गोळाचा कारखाना उघडला आणि त्यात ते दिवसरात्र झटत राहिले. त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावू लागली. पण देशभक्तीच्या धुंदीत हरवलेले यशवंतराव यांना त्यांच्या ध्येयापुढे काहीही दिसत नव्हते. अखेर २८ ऑक्टोबर १८११ साली इंग्रजांशी लढताना यशवंतरावांना वीरमरण आले, तेव्हा ते केवळ ३५ वर्षांचे होते. ते एक असे शासक होते ज्यांच्यावर इंग्रज आपलं अभिपत्य नाही मिळवू शकले, ज्यांनी इंग्रजांच्य नाकीनऊ आणून सोडले.
आपले जीवन त्यांनी भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले.
जर त्यांच्याप्रमाणेच भारतातील इतर शासकांनीही भारत मातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याच्या संघर्षात त्यांची साथ दिली असती तर इंग्रज भारतावर एवढे वर्ष राज्य करू शकले नसते.
भारतातील जनतेला त्यांची गुलामगिरी करावी लागली नसती.
त्यांचे अत्याचार सहन करावे लागले नसते.
जर यशवंतराव त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सफल झाले असते तर आज देशाची चित्र काही औरच असते. इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराच्या त्या कटू आठवणी आपल्या इतिहासात नसत्या, तर केवळ या शूरांची वीरगाथा असती.
पण यशवंतरावांसारख्या शूर आणि पराक्रमी विरांमुळेच आज आपण या स्वतंत्र भारतात सुखाने जगत आहोत.
महाराजा यशवंतराव होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Most Popular

To Top