बीड । प्रतिनिधी पाटोदा तालुक्यातील थेरला येथील सरपंच स्वाती शिवाजी राख यांच्या घरावर गावातील महेंद्र भिमराव राख, भिमराव विठ्ठल राख यांच्यासह पाच जणांनी दगड- काठ्या व इतर साहित्य बाळगुन खुनी हल्ला केला. सुभाष भिमराव राख यांनी संतोष तुकाराम राख व त्यांची पत्नी अरूणा राख यांना मारहाण करीत महेंद्र राख यांनी डोक्यात फावडे घातल्याने अरूणा राख या गंभिर जखमी झाल्या आहेत. पाटोदा पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून दोन दिवस झाले तरी कोणासही अटक करण्यात आले नाही.
थेरला येथील सरपंच स्वाती राख यांच्या जाऊ अरूणा राख यांनी घरासमोरील रिकाम्या जागेत जेवण झाल्यावर खरकटे पाणी फेकले. याचा राग मनात धरून महेंद्र राख, भिमराव राख, सुभाष राख, मनिषा राख यांनी सरपंच राख यांच्या घरावर जोरदार दगडफेक सुरू केली. अरूणा राख व त्यांचे पती संतोष राख यांना घरात घुसून घराबाहेर ओढत आणले. महेंद्र राख यांनी अरूणा राख यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी त्यांच्या डोक्यात फावडे मारल्यांने गंभिर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्या होत्या. राख दोघे पती, पत्नींना जबर मारहाण करून सुभाष राख यांच्यासह इतर काहीजण तेथुन पसार झाले. त्यानंतर जखमी अरूणा व संतोष यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दि.24 जुलै रोजी पाटोदा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून महेंद्र राख, भिमराव राख, सुभाष राख, मनिषा राख व इतर एकाविरूध्द कलम 326, 452, 323, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवस झाले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.
महेंद्र राखसह सुभाष राख यांना हद्दपार करा – स्वाती राख
महेंद्र राख व त्यांच्या कुटूंबियांनी गेल्या अनेक वर्षापासून गावात दहशत माजवली असून ते नेहमीच गावामध्ये मारहाण करून नागरिकांना त्रास देत आहेत. तसेच ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये नेहमीच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महेंद्र राख, सुभाष राख यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना हद्दपार करावी अशी मागणी थेरला येथील सरपंच स्वाती शिवाजी राख यांनी केली आहे.