सोमवारी अधिवेशनातही विषय मांडणार
परळी वै.दि.30. पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामाचा विमा भरण्यापासुन राज्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याने पिक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची तातडीने मुदतवाढ जाहिर करावी अन्यथा शेतकर्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिला आहे. या संबंधी सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा सरकारपुढे मांडणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याची सोमवारची शेवटची मुदत आहे. ऑनलाईनच्या घोळामुळे हे काम कासव गतिने सुरू आहे. बँकांसमोर शेतकर्यांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. दिवस रात्र शेतकरी बँकेसमोर थांबत आहेत. या रांगेत उभा ठाकलेल्या भोकर तालुक्यातील किनी येथील शेतकरी रामा लक्ष्मण पोटरे याचा आणि बीड जिल्ह्यातील मंचक इंगळे या शेतकर्याचा मृत्यु झाला. ठिक ठिकाणी शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. आम्ही वारंवार सरकारकडे मागणी करूनही सरकार पिक विम्याची मुदत वाढवुन देण्याबाबत तयार नाही. त्यामुळे शेतकरी संतापला असुन, याबाबत सरकारने तातडीने मुदत वाढवुन द्यावी अन्यथा शेतकर्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला. नोटा बंदीच्या निर्णयामुळे अनेकांना बँकेच्या रांगामध्ये आपले प्राण गमवावे लागले होते. आजही त्याचेच पुनरावृत्ती होत असल्याचे ते म्हणाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टिका ही त्यांनी केली आहे.
—————————————-