श्रीनगर- काश्मीरमधील गुरेझ सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनाच्या घटनेत शहीद झालेल्या जवानांची संख्या १४ वर पोहोचली आहे. दोन छावण्यांमधील १० जवान शहीद झाल्याची बुधवारी माहिती होती. आज आणखी ४ जवानांचे मृतदेह सापडले. या जवानांचा मृत्यू हिमस्खलनामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून झाला असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही जवान बर्फाची कडा कोसळल्याने बर्फाखाली दबले असून त्यांचा शोध घेतला जात होता. आतापर्यंत एका अधिकाऱ्यासह सात जवानांची सुटका करण्यात आली आहे. हे जवान सीमेवर गस्त घालत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरेझ सेक्टरमध्ये १५ दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. यामुळे संपुर्ण गुरेझ हिमवादळाच्या तडाख्यात सापडले. राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी गुरेझ सेक्टरमधील प्रभावित नागरिकांना शक्य ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले.