मुख्य बातम्या

मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी धनंजय मुंडे प्रचंड आक्रमक

मेडीकल प्रवेशाची प्रादेशिक आरक्षणाची कोटा पध्दत रद्द करा

मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण प्रचंड आक्रमक

नागपूर दि.17 – वैद्यकीय प्रवेशासाठी जात आणि प्रवर्ग निहाय आरक्षण असतानाही प्रादेशिक आरक्षणाची 70 :30 कोटा पध्दत लागू केल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. घटना विरोधी असलेली ही कोटा पध्दत रद्द करण्याची मागणी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून विधानपरिषदेत करण्यात आली. या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.अमरसिंह पंडित, आ.सतिश चव्हाण आक्रमक झाले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी दिले. मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आमदारांचे समाधान झाले नाही त्यामुळे वेलमध्ये उतरून त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रादेशिक आरक्षणाची 70:30 कोटा पध्दत सुरू केल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आणि प्रवेशित जागा अतिशय कमी आहेत. उलट एम्स, निट यासारख्या परिक्षेत मराठवाड्यातील विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करत असुन मराठवाड्यात गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर असतानाही केवळ प्रादेशिक आरक्षणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाहीत.यासाठी विद्यार्थी – पालक संघर्ष समितीने शासनाकडे पाठपुरावा करूनही शासन निर्णय घेत नसल्यामुळे हा विषय आ.अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातुन विधानपरिषदेत उपस्थित केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.सतिश चव्हाण यांनी याविषयावर अतिशय आक्रमकपणे सभागृहात बाजु मांडली.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागु करण्यात आलेली प्रादेशिक आरक्षणाची पध्दत चुकीची असुन घटनाविरोधी आहे. मराठवाड्यात केवळ 6 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात 23 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. प्रवेशित जागांची संख्या सुध्दा अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असतानाही या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाहीत. सरकारने प्रादेशिक आरक्षण लागू करताना कोणताही कायदा किंवा घटनात्मक तरतुदी न करता हे आरक्षण लागु केले आहे व ते तातडीने रद्द करण्याची मागणी करून मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.अमरसिंह पंडित, आ.सतिश चव्हाण यांनी केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या उत्तरात विरोधी पक्षातील आमदारांचे समाधान झाले नाही त्यामुळे वेल मध्ये उतरून आमदार अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण व इतर आमदारांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. शेवटी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

Most Popular

To Top