बीड– भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी श्रद्धांजली वाहिली.आणि अटलजी आणि त्यांच्या भेटीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला .
सुरुवातीच्या काळात अटलजींच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, बीड जिल्ह्यात, मराठवाडयातील त्यांच्या अनेक सभांच्या नियोजनात माझा सहभाग होता, त्यांच्या एका सभेचे सूत्रसंचलन केल्यानंतर त्यांनी सभा संपल्यानंतर आवर्जून जवळ बोलावून चांगला बोलतोस असे म्हणून पाठीवर थाप दिली होती हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही,अशी जुनी आठवण त्यांनी सांगितली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातल्या एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. देशाचं लाडकं, सर्वमान्य नेतृत्वं आपण गमावलं आहे. अटलजी राजकारणातील आदर्शपुरुष होते. सत्तारुढ व विरोधकांमधील समन्वयानं त्यांनी भारतीय राजकारणाला, लोकशाहीला उंची प्राप्त करुन दिली, त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणार नाही,
अटलजींचं व्यक्तिमत्वं बहुआयामी होतं. ते बुद्धीवंत होते. विचारवंत होते. महान साहित्यिक होते. संवेदनशील कवी होते. माणूस म्हणून ते कितीतरी थोर होते. दूरदृष्टीचे आणि साहसी नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचं नेतृत्वं वादातीत आणि वक्तृत्वं आद्वितीय होतं. त्यांची भाषणं हा भारतीय राजकारणातला मोठा ठेवा आहे. भारतीय राजकारणाला नैतिक अधिष्ठान देण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. संपूर्ण जीवन राष्ट्रकार्याला वाहून घेतलेले ते नेते होते. देशाच्या प्रगतीतलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणाची, साहित्यविश्वाची आणि व्यक्तिश: माझीही मोठी हानी झाली आहे. मी त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहतो.