व्यक्ती विशेष

एक रूपयाही न घेता कीर्तन करणारे महाराज; ह.भ.प रामकृष्ण रंधवे बापू महाराज

माणूस मरताना सोबत काहीच घेऊन जात नाही असं सांगणारे बाबा, बुवा, महाराज सुद्धा २०-२५ हजार घेतल्याशिवाय कीर्तनाला उभा राहत नाहीत. पण या सगळ्या परिस्थितीत अपवाद आहेत, ता.पाटोदा जि. बीड येथील ह.भ.प रामकृष्ण रंधवे बापू महाराज.

राष्ट्रसंत भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, चाकरवाडी येथील माऊली महाराज यांचा परिसस्पर्श लाभलेले रंधवे बापू हे गेल्या ३१ वर्षांपासून खांद्यावर पताका घेऊन महाराष्ट्र्र, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये विविध भागात मोफत कीर्तन सेवा देत आहेत.

जुन्या काळातील B.Sc मॅथेमॅटिक्स चे शिक्षण घेतलेले रंधवे बापू संत विचाराने प्रभावित होऊन आपल्या किर्तनाद्वारे समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, ग्रामविकास, शिक्षण या क्षेत्रात जागृती करत आहेत. कोणताही ऋतू असू द्या किंवा ऊन वारा पाऊस काहीही असू द्या वर्षांचे ३६५ दिवस स्वखर्चाने, पायाला भिंगरी लावून बापू समाजाची, ईश्वराची सेवा करत आहेत. ती करताना ते कोणताच मोबदला स्वीकारत नाहीत, इतकंच काय कोणी पायावर पैसे मांडले तरी देखील त्या पैशाला शिवत नाहीत.

संत तुकाराम महाराजांची वारकरी संप्रदायातील थोर परंपरा ते शेवट्या श्वासापर्यंत चालवणार असल्याचा संकल्प त्यांनी केला आहे. नुकतीच त्यांच्या या कार्याच्या महती ची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. बाबा लोकांनी पैसे घेऊ नयेत असं मुळीच नाही, उत्तम जगण्यापूरती बिदागी त्यांनी घेतलीच पाहिजे पण पन्नास-पन्नास हजार रुपये घेऊन अध्यात्म सांगणाऱ्या महाराज लोकांनी बापूचा आदर्श घ्यावा अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात .., देह काळाचे, धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे !!

© चांगदेव गिते – 9665875816

Most Popular

To Top