मुंबई– देेशातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजब उत्तर दिलं आहे. ते म्हणाले इंधन दरवाढीला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. ते नाशीकमध्ये बोलत होते.
इंधन दरवाढीविरोधात विरोधकांनी केलेल्या आंदोलनाबद्दल विचारलं असता आंदोलन करत सरकारवर आरोप करणं हे विरोधकांचं कामच असल्याचं दानवे यांनी म्हटलं. काही महिन्यांपूर्वी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र राज्यातील ज्या भागातून हे हल्लाबोल आंदोलन केलं गेलं, त्या सर्व भागात झालेल्या महापालिका आणि इतर सर्व स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपला यश मिळालं आहे.
तसंच, इंधन GST कक्षेत आणल्यास इंधन दर आटोक्यात येणं शक्य आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यातील अर्थमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुरू आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देखील दानवे यांनी दिली. तसंच लोकसभा निवडणुकीतील युतीसंदर्भात लवकरच शिवसेनेसोबत बैठक आणि चर्चा करणार असल्याचंदेखील दानवे यांनी सांगितलं.