मुंबई – राज्यातील एस.टी. कर्मचार्यांना 4 हजार 849 रूपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा फसवी असून कर्मचार्यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एस.टी. कर्मचारीही सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना दिवाळी गोड साजरी करू देणार नाहीत. असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या उपोषणाला त्यांनी आज भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी आ.अशोक धात्रक, संघटनेचे सरचिटणीस श्री.हनुमंत ताटे उपस्थित होते.
ज्या-ज्या वेळी सरकार ऐतिहासिक शब्द वापरते तेंव्हा तेंव्हा फसवणुक होणार हे नक्की असते, ऐतिहासिक कर्ज माफी म्हणून केलेली कर्जमाफी फसवी निघाली, त्याचप्रमाणे रावते यांची ऐतिहासिक पगारवाढीच्या घोषणाही फसवी निघाली आहे. अद्याप कर्मचार्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, यामुळे आता मी स्वतः कामगारांच्या खांद्याला खांदा लावून लढा देऊ अधिवेशनापूर्वी हा लाभ न मिळाल्यास अधिवेशन चालु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संघटनेच्या पाठीमागे आदरणीय शरदचंद्र पवार यांची ताकद उभी असल्याने कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लागे पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे सांगतानाच हे सरकार एस.टी. महामंडळासह महाराष्ट्राला विकुन टाकायला निघाले आहे. या सरकारला उलथून टाकण्याची गरज असून, एस.टी. कर्मचार्यांनीच सरकारची घंटी वाजवण्याची वेळ आली असल्याचं मुंडे यांनी म्हटले आहे.