इतिहास

भटकंती घनगडाची…

पाठीवर बँग, अंगात स्वेट शर्ट, कानाला आणि डोक्याला घट्ट बांधलेली मफलर, हातात मोबाईल, कानात अडकवलेल्या हेडफोनमधील गाणे ऐकत आम्ही टूव्हिलरवर पहाटेच पुण्याच्या बाहेर पडलो होतोत.

घनगड. पुण्यापासून ९० ते १०० किलोमीटर. तर लोणावळ्यापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर डोगररांगेत वसलेला हा गड. गडाचा तसा फारसा ईतिहास माहित नाही. पण आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीचा गड म्हणून याचा वापर केला जायचा. तसंच गडाला धनगड किंवा येकोल्याचा गड
म्हणूनही ओळखंल जातं.

रस्ता चुकल्यामुळे बेंगलोर-पुणे हायवेरून दुचाकीला प्रवेश नसतानाही त्याच हायवेनं लोणावळा गाठलं होतं. सोबत मोबाईलंच GPS चालू असतानाही. मनातल्या शंकेमुळे रस्त्यात भेटणाऱ्याला गडाची वाट विचारणं चालूच होतं. थंडीनं पार गारठीलं होतं. म्हणुन चहाचा झुरका मारून पुन्हा प्रवासाला लागलो होतोत. भूसी डँम, आएनएस शिवाजीला माघे टाकून गाडी घाटवळणाला लागली होती. घाटानं जसं जसं वर जाऊ तशी थंडी अजूनच वाढत होती.

आडवळणाचा घाट संपल्यानंतर झाडीतून जाणारा रूंद असा हायवे सुरू झाला होता. KTM RC, Suzuki Hayabusa, Yamaha Fazer, Royal enfiled, वरून घाटाची रायडिंग करणारे तरूण दिसत होते. मॉर्निग वॉकसाठी आलेली माणंस होती. मध्येच एखादी BMW, Audi, किंवा Mercedes भर्रकन सुसाट जात होती. व्हँलीकडे जाण्यासाठीच्या मार्गाचे, व्हँलीतल्या रिर्साटच्या जाहीरात विक्रीचे सुसज्ज असे फलक लक्ष वेधतं होते. रस्त्याच्या बाजूला हॉटेलची गर्दी होती. झाडांच्या गर्दीत लपलेले रो हाऊस दिसत होते. सुर्यानी डोकं वर काढल्यामुळे गर्द झाडीतून सुर्याचं एखादं किरण अंगावर पडत होतं.

पेठ शहापूर गावातून ऊजव्या हाताला वळल्याबरोबर अरूंद डांबरी रस्ता सुरू झाला होता. रायडिंगच्या जागेवर सायकलवर गाडीवर दुधाची कँन घेवून जाणारे दिसत होते. भाताची काढणी सुरू झाल्यामुळं माणसांच रानाकडं मॉर्निग वॉक सूरू होता. एखादं जिपडं, लालडब्बा मोठ्ठा आवाज करत ओव्हरटेक होत होतं. ग्रामपंचायतीनं गावातच लावलेल्या पाटीशिवाय कुठंपर्यत आलोय याचा ठावठिकाणाही लागत नव्हता.

पुढं जावं तसं डांबरीरस्ताचही खड्डेकरण झालं होतं. आणि त्यात सुरू झालेला आणखी एक घाट. खाचखळग्यांचा घाट पार करून बयाजी खिंडीतून खाली उतरल्या बरोबर घनगड नजरेत भरत होता. भांबूर्डे गावातून ऊजव्या बाजूला कच्चा रस्त्यानं गडाच्या पायथ्याशी असलेल्या एकोले गावात पोहचलो होतोत.

९ वाजले होते. गड चढणीला सुरवात केली होती. गावातून गडाकडे पायवाट जाते. त्या वाटेनं थोडं चालल्यानंतर दाट झाडीतून वर जाणारी पायवाट सुरू होते. आडवळणाच्या पायवाटेनं जाताना मध्ये गारजाईचं मंदिर लागतं. मंदिराची डागडुजी केल्यामुळे मंदिर चांगल्या अवस्थेत आहे. मंदिरासमोर दोन दिपमाळा पाहायला भेटत्यात. मंदिराच्या बाजूनं वरती जाताना काही पायऱ्या लागतात. त्याच्या आधारे थोडसं वरती गेल्यावर पहिला दरवाजा दृष्टिस पडतो.

दरवाजा म्हणजे शिल्लक राहिलेले काही अवशेष. दरवाजातून चढून वर गेल्याबरोबर दोन गुहा लागतात. त्याच्याच शेजारी वरती जाण्यासाठी सध्या शिडीचा वापर करावा लागतोय. शिडी चढल्याबरोबर पाण्याची उत्तम सोय पाहायले भेटते. एक खांबी, दोन खांबी असे पाच ते सहा टाके आहेत. वरती जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे लावलेल्या रोपच्या आधारे महादरवाज्यापर्यत पोहचता येतं. महादरवाजातून आत गेल्यावर गडाची सदर पाहायला भेटते.

उजव्या बाजुला मोडकळीस आलेला बुरूज अजूनही तग धरून उभाय. गडावर वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. गडावर पाण्याच्या सोयीसाठी तयार केलंल पाण्याचं टाके आहेत. गवतानं आणि फुलाच्या झाडानं गर्दी केल्यामुळं बाकीच्या पडलेल्या वास्तूचे ठावठिकाणही दिसत नाहीत. मात्र पुर्वेकडची दरी. पश्चिमेकडे तैला-बैला, त्याच्याच शेजारचा सुधागड लक्ष वेधतो. गडावरून २५-३० घराचं ऐकोले गाव अजूनचं छोटं वाटतं. एखाद्या फाटलेल्या शर्टाला लावलेल्या ठिगळासारखं हिरवळीत भाताचे पांढरे पट्टे दिसतात. गडावर जास्त वास्तू नसल्यामुळे गड लवकर पाहुन झाला होता. गडावर जेवढ्या वास्तु आहेत त्या सगळ्या पाहण्यासारख्या आहेत. राहिलेल्या वास्तूचं जतन संवर्धन होणं गरजेचंय.

गडावर बऱ्याच वेळ बसल्यामुळं दुपार टळून गेली होती. गड उतरणीला सुरवात केली होती. रोपच्या साथीनं गड भराभर उतरलो होतोत. रविवार असला तरीही फारशी पर्यटकांची गर्दी नव्हती. पायथ्याशी येवून पोटातली भूक मिटवली होती. जेवायला तांदळाची भाकरी, ठेचा, चटणी,भेंडीची भाजी शेवटी प्यायला ताक म्हणल्यावर विचारायलाच नको.
शेवटी ताकाचा ढेकर देत टेहळणीचा घनगड पाहून परतीच्या प्रवासाला निघलो होतोत.

सुबोध शिंदे- 7030507553

Most Popular

To Top