महाराष्ट्र

हा आहे राष्ट्रवादी चा नवा गडी नवा डाव चा नवीन मास्टर प्लॅन

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात सुरू झालेल्या आऊटगोईंगमुळे राष्ट्रवादी काँग्रेस चिंतेत आहे. पण हीच चिंता दूर करण्यासाठी आता राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत.’नवा गडी नवा डाव’ चा मास्टर प्लॅन आखण्याच्या तयारीत राष्ट्रवादी आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या आऊटगोईंगला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी मधील तरुणांना अधिकाधिक संधी देण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्य कार्यकारणीच्या संघटनात्मक आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार सुप्रिया सुळे हे पक्षातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह सर्वच जिल्ह्यातील युवक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. या आऊटगोईंमुळे राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. अशातच आता पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नवी रणनीती आखल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची अनेकदा चर्चा होते. पण आता पवारांना पुन्हा शह देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि काही नेते गळाला लावले आहेत. त्यामुळे पक्ष सोडलेल्या नेत्यांना दणका देण्यासाठी पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नेत्यांच्या आऊटगोईंगची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीही भाजपचाच शैली अवलंबणार आहे. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का, याची राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे. तसंच मतदारसंघात तरूण नेत्यांना बळ देऊन पक्षांतर केलेल्या नेत्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी विशेष मेहनत घेणार असून युवा नेतृत्व म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या महाराष्ट्र राज्यव्यापी दौऱ्याची देखील चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

Most Popular

To Top