मुख्य बातम्या

महाप्रलय तत्सबंधी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या.

बरोबर आठवडा झाला , जल-तांडवाला सुरुवात होऊन . जल-तांडव सुरु झाले आणि आठ दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली ,सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात होत्याच नव्हतं झालं . दुर्देवाने या महा-प्रलयाची सूतराम पूर्वकल्पना आली नाही . यंदा पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी असेल हा हवामान खात्याचा अंदाज , कोरडा गेलेला जून आणि निम्मा जुलै महिना . यामुळे सर्व-सामान्य जनतेला असं काही होईल असं वाटण्याची शक्यता नव्हती . आणि या अस्मानी संकटाची चाहूल घेण्यात भारतीय हवामान खाते आणि इतर तत्सबंधी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या .
आज आम्ही चंद्रावर जाण्याच्या वल्गना करतो . एका मागून एक अश्या अद्ययावत उपग्रहांची मालिका अंतराळात सोडतो आणि स्वतःच्या देशाला तंत्रज्ञानात अव्वल दर्जाचे मानतो . आणि तेव्हा मात्र अश्या अस्मानी संकटांची जाणीव आम्हाला होत नाही , हे आमचं , आमच्या तंत्रज्ञानाचं खूप मोठं अपयश आहे ! विज्ञानाचा – तंत्रज्ञानाचा जर सामान्य माणसाच्या जीवनातील समस्या सोडवण्यात उपयोग होत नसेल , तर मग आपण खरंच प्रगत आहोत का हा प्रश्न मनाला वेदना देतो !
पाऊस पश्चिम महाराष्ट्र , कोकण आणि घाटमाथा येथे येथेच्छ कोसळत होता . चहुबाजूने पाणी धरणाकडे धाव घेत होत . धरणांची पातळी झपाट्याने वाढत होती . पाऊस अखंड कोसळत होता . आणि धरणांतुन पाण्याचा विसर्ग सुरु झाला . नद्यांच्या पातल्या वाढायला सुरुवात झाली , कृष्णेला पूर येऊन तो महापुरात रूपांतरित केव्हा झाला हे कळलंच नाही . आणि त्याबरोबरच पंचगंगा , वारणा , कोयना आणि इतर नद्यांनाहि पूर येऊ लागले . झपाट्याने नद्यांच्या पाण्याने गावे , वाड्या, वस्त्या , पेठा, शहरे कवेत घ्यायला सुरुवात केली . सगळीकडे पाणीच पाणी झाले .
आणि जेव्हा या जल- प्रलयाने रौद्र रूप धारण केले , पाणी नाकातोंडाशी आले , जनतेचा आक्रोश आणि संताप लाव्यासारखा फुटू लागला तेव्हा प्रशासन – सरकार खडबडून जागे झाले , आणि धावपळ सुरु झाली . होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असलेले सरकार आणि प्रशासन यंत्रणाची पावले पश्चिम महाराष्ट्राकडे वळली . प्रचारासाठी काढलेल्या यात्रा रद्द करून नेते मंडळी पूरग्रस्त भागात येऊन पोचले . आणि सहानुभूती दाखवू लागले . पण तोवर ..तोवर सगळं संपलं होत .
नैसर्गिक आणि साधे सरळ प्रश्न असे कि महापूर जण-जीवन विस्कळीत होऊस्तोवर राज्य पातळीवरील प्रशासन गाफील कसे राहिले ? पावसाचे प्रमाण , साठा आणि विसर्ग याचे गणित का चुकले ? अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी वेळीच संवाद आणि समन्वय का साधला गेला नाही ? NDRF आणि लष्कराला वेळीच पाचारण का करण्यात आले नाही ? दरवेळी लोक दगावल्यावर , अपरिमित हानी झाल्यावरच प्रशासन जागे का होते ? सरकार आणि प्रशासन जनतेशी बांधील आहे कि नाही ? उत्तरदायित्व आहे कि नाही ? सामान्य जनता एवढे कर सरकारला देते , सरकारची जबाबदारी नाही का कि किमान लोकांच्या जीविताची हमी घ्यावी ? त्यांना स्वतःचे जीव वाचवण्याची यंत्रणा सज्ज करून ठेवावी ? कि विनाश झाल्यावरच तुम्ही सहानुभूती दाखवायला येणार ?
सरकारचे काही प्रतिनिधी अशा परिस्थितीतही कसे बेजाबदार वर्तन करत होते , हे जनतेने पहिले . उशिरा का होईना आलेल्या मदतीवरही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन प्रचार ? शासकीय मदतीवर लोकप्रतिनिधींचे फोटो ? तुम्ही उपकार करताय ? खिशातले देताय ? तुम्ही जनतेचे नोकर आहेत , सेवक आहेत ! मालक किंवा आश्रयदाते नाहीत ? किती निर्लज्जपणा किती बेशरमपणा ? सत्तेचा किती माज ? जनता ध्यानात ठेवते , हे तुम्ही लक्ष्यात घ्या !
आज मितीला लाखो लोकांचे संसार बुडाले .किडुक-मिडूक साठवलेलं धुवून नेलं .घर-दार वाहून गेली .अवती-भोवती पाणीच पाणी पण घशाची तहान भागवायला पाणी नाही .वीज नाही .संपर्क तुटलेले . चार-चार दिवस लोक घराच्या छपरावर आणि माळ्यावर अडकून राहिले . वयस्कर लोक , आजरी लोक , अवघडलेल्या स्त्रिया , लहान बाळ यांचे तर हालच हाल . आणि जनावरांचे तर विचारू नका . मुकी बिचारी ,जिकडे वाट मिळाली तिकडे पाण्याबरोबर वाहत गेली , काही तरली काही बुडून मेली . आणि या सगळ्यात हृदय पिळवटून टाकणारी दुःखद घटना म्हणजे ब्राम्हनालमध्ये ३० जण घेऊन निघालेल्या नौकेला जलसमाधी मिळाली आणि त्यात जवळ-जवळ १२ जण मृत झाले . जेव्हा बुडालेले लोकांचे मृतदेह वर काढण्यात आले त्यात एक माउलीने आपल्या छोट्या बाळाला कवटाळून घेतले होते . काय दुर्देवी प्रसंग आहे ? आजही दूरदर्शवर जे पाहायला मिळतंय , प्रसंग पाहतोय , ऐकतोय ते कल्पना शक्तीच्या पलीकडे आणि हेलवणारे आहेत .
या सगळ्यामध्ये प्रसारमाध्यमानी परिस्थतीचे गांभीर्य ओळखून त्यांची कामगिरी योग्यपणे बजावली असं म्हणावसं वाटत . खूप परिश्रम आणि धोका पत्करून त्यांनी सलग coverage केले . लोकांच्या अडचणी , त्रास , संकट , समस्या त्यांनी जगापर्यंत पोचवल्या . त्यांच्यामुळेच ह्या जल-प्रलयाची व्याप्ती राज्यातील आणि देशातील जनतेला समजू लागली . आणि कदाचित राज्यपातळीवर प्रशासन गांभीर्य ओळखून कामाला लागले . उशिरा का होईना पण वरिष्ठ पातळीवरून वेगाने मदतकार्य , पुनर्वसन सुरु झाले , अजून काम सुरु आहे आणि अजून खूप दिवस त्याची गरज भासणार आहे .
नुकसान , जीवित आणि वित्त हानी अपरिमित आहे . आज लाखो लोक बेघर आहेत , दुभती जनावरं वाहून गेलीत . कपडे-लत्ते , धन-धान्य , घरे , पैसा-अडका सगळं वाहून गेलय . संसारचं वाहून गेलेत . काडी-काडी करून उभारलेली घरटी उध्वस्त झालीत . अन्न-वस्त्र-निवारा गरजा खूप मोठ्या आहेत . शेतीच प्रचंड नुकसान झालय . लाखो एकर शेती खरवडून गेलीय . पिके वाहून गेलीत . शेतात गाळ भरलाय , वीजपंप पाण्यात आहेत , वाहून गेलेत . ठिबकसिंचन आणि पाण्याच्या पाईप्स वाहून गेलेत . शासनाची तिजोरी सढळपणे खुली करणे गरजेचं आहे . सरकारने तस वाचन दिल आहे पण प्रत्यक्षात करण गरजेचं आहे . वेळ निघून जाईल , हळू-हळू सगळं शांत होईल आणि मग नियमांच्या चौकटीत नुकसान भरपाई अडकून जाईल . पूर्वानुभव लक्ष्यात घेता , आता असं होऊ नये , हि अपेक्षा आणि विनन्ती ! नियमाच्या आणि चौकटींच्या बाहेर जाऊन मदत आणि पुनर्वसनाची गरज आहे . येथून पुढे सार्वजानिक आरोग्याचा प्रश्न हा खूप मोठा असणार आहे . रोगराई फैलाऊ नये म्ह्णून आता वेळीच त्यावर उपाय योजले पाहिजेत , तसे चालूही झालेत .
या अस्मानी आपत्तीमध्ये आणि संकटग्रस्त परिस्थतीमध्ये मोलाचं काम केलंय ते स्थानिक पातळीवरील प्रशासनाने , जनतेने , तरुणांनी , गावो-गावाच्या सार्वजनिक मंडळांनी ! NDRF आणि लष्कराचे जवान यांनीही खूप हिमतीने आणि हिकमतीने बचावकार्य केलय आणि करत आहेत … त्या सगळ्या हिरोना माझे कोटीं-कोटीं सलाम आणि त्रिवार वंदन ! कारण या संकटाच्या काळी हे देवदूत म्हणून उभे राहिलेत . यातले कोणीही ज्ञात नाहीत कि मदतीच्या जाहिरातीत दिसले नाहीत पण त्यांनी जे काम केलं ते अमौलिक आहे .
आज एकमेकांच्या मदतीला धावून आलेत ते स्थानिक पातळीवर एकमेकांचे शेजारी , मित्र , गावकरी ! जात-पात , धर्म-पंथ , गट-तट , राजकारण सगळे विसरून लोकांनी एकमेकांचे हात संकटात धरलेत . हात दिलेत आणि सावरायचा प्रयत्न केलाय !
आज असंख्य दृश्य आणि अदृश्य हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत . राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावरून मदत पाठवली जातेय . अगदी लहान मुलांच्या खाऊच्या पैश्यापासून ते भिशीतील पैश्यापर्यंत …बकरी ईदच्या सणातील बचतीपासून ते गणपतीच्या उत्सवाच्या खर्चातील कपातीपर्यंत …सरकारी नोकरांच्या पगारातील मदतीपासून ते कचरा वेचणाऱ्या हातावर पोट भरणाऱ्या कामगारांच्या मजुरीपर्यंत …त्या सगळ्यांचे धन्यवाद !
खरंच आभाळ फाटलंय आपण ते आपापल्या परीने शिवायचा प्रयत्न करूयात ! आपणही खारीचा वाट उचलून मदत कार्याला सहभाग लाऊयात !
आता मात्र या महाप्रलयातून आपण काही गोष्टी शिकुयात आता ..
आपण आपले शेजारी , गावातील गावकरी , सगळेजण ……पक्ष , धर्म ,जात, गट-तट आणि राजकारण यापलीकडे जाऊन आपली एकीची वज्र मूठ अखंड बुलंद ठेउयात . जाती-धर्मावर समाजात फूट पडून आपल्या राजकारणाची सोय पाहणारे , आपल्या मदतीसाठी सगळ्यात शेवट येतात , आणि तो बहुतांशी देखावा असतो . पहिल्यांदा मदत करणारे आपण आपले शेजारी आणि गावकरी असतो .
निसर्गाच्या हाकेकडे आणि इशाऱयांकडे दुर्लक्ष्य करून नदी पात्रा मध्ये आक्रमण झालेत आणि नद्या संकोचं पावल्यात . पुन्या – मुंबईत तर ओढे आणि नाले बुजऊन बांधकामे झालीत . आपण या सगळयांचा विचार करून ,किमान आपले नुकसान होऊ नये यासाठी तात्पुरत्या फायद्याच्या मागे न लागता शाश्वत आणि अक्षय गोष्टीचा विचार करूयात .
आतापर्यंतच्या काळातील अनुभव गाठीशी घेऊन नद्यांच्या काठाला जेवढी गावे आहेत , त्यां ग्राम-पंचायतींना अश्या स्वरूपाच्या अस्मानी संकटाना स्वावलंबी आणि सक्षम बनवणे गरजेचं आहे . अश्या आपत्तीच्या पासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती साधन , जसे कि life -jackets , छोट्या होड्या /नौका असणे गरजेचं आहे . त्यासाठी योग्य त्या निधीची सोय होणं आणि त्याचा प्रत्येक्षात विनियोग होणं गरजेचं आहे . शासन पातळीवर दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तश्या सूचना देऊन आणि त्याचे प्रात्यक्षिक होणं गरजेचं आहे .
हवामान खात्याचे अंदाज आता अगदी अचूक सोडा पण थोडे बरोबर तरी आले पाहिजेत . गेल्या आठवड्यात गुरुवार , शुक्रवार , शनिवार पुण्यात आणि धरण परिसरामध्ये अतिवृष्टी आणि धोक्याची सूचना देण्यात आली आणि अगदी उलटे या तुम्ही दिवस पाऊसाचा जोर कमी होऊन सूर्यदर्शन झालं . तर यासाठी प्रगत देशाकडून अचूक हवामान अंदाजाकरिता तंत्रज्ञान आयात करायला हवं , लोकोपयोगी तंत्रज्ञानाकरिता खाजगी आणि सरकारी पातळीवर योग्य गुंतवणूक होऊन ते तंत्रज्ञान लोकांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी झाले पाहिजे . अन्यथा आपले प्रगतीचे दावे फोल आहेत .
पावसाळा सुरु होण्यापूर्वी शासनपातळीवर स्थानिक प्रशासन , NDRF , राज्यशासन यांच्यातील समन्वय बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे . धरण परिसरातील संपर्क यंत्रणा अजून सक्षम आणि वेगवान व्हायला हव्यात .
आजपर्यंतचा अनुभव पाठीशी घेऊन राष्टीय महामार्ग , राज्य महामार्ग , स्थानिक रस्ते , कोकण आणि देशाला जोडणारे रस्ते याची पुनर्बांधणी / पुनरचना कारण आवश्यक आहे . आज मुंबई-बंगलोर महामार्ग , पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत अतिशय वाईट अवस्थमध्ये आहे . कित्येक वर्षे कामे चाललित पण अजून पूर्ण नाही . महामार्गाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे . आजवर कित्येक निरपराध लोकांचा जीव या महामार्गवर गेलाय . महामार्ग सुरक्षित नाही . पावसाळ्यात तर आणखी हाल होतात . खड्डे पडतात , कित्येक किलोमीटरच्या रांगा लागतात . आपण एवढे महागडे टोल भरतो पण आपल्याला काय दर्जाची सेवा मिळते ? सत्तेवर येणारे शासन सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासाने देतात , सत्ता मिळवताना खोटे दावे करतात . परंतु मूळ समस्या आणि आजार कायम तश्याच राहतात ! असो !
आता आपण या महाप्रलयातून सावरायला हवं , शिकायला हवं आणि शहाणं व्हायला हवं ! जे गमावलं ते गमावलं , पण भविष्यात अशी वेळ येणार नाही , यासाठी काम करूयात !
जाता-जाता एक सांगावस वाटत अगदी मनापासून … पश्चिम महाराष्ट्र आहे शिवरायांच्या मर्द मराठ्यांचा , मावळ्यांचा आणि वारसांचा … झुंजणाऱ्या आणि झुंजवणाऱ्या लोकांचा …त्याच्यासाठी मला इथे कवी कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता “कणा” आठवते !

कणा
ओळखलत का सर मला !
पावसात आला कोणी ?

कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी
बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला

मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा !

लेख : राजेंद्र जंगम

Most Popular

To Top