पंकजाताईंची अर्थहीन उठाठेव
2009 ला अचानक आमदारकी मिळालेल्या पंकजा मुंडे यांना 2014 मध्ये विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले होते मात्र मोदी लाटेत व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहानुभूतीच्या भावनिक लाटेत ते आव्हान फिके पडले आणि पंकजा मुंडे आमदार व नामदार झाल्या. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला धोरणी व दूरदृष्टी असलेल्या मुंडे साहेबांची लेक आता त्यांची जागा घेईल या अपेक्षेने त्यांच्यावर अर्धा डझन खात्यांची जबाबदारी टाकली होती. अत्यंत आश्वासक रित्या पंकजाताई ही खाती सांभाळतील व विधायक कार्य करतील अशी अपेक्षा समस्त मुंडे समर्थकांनी केली होती. परंतु ताई ती अपेक्षा त्या प्रमाणात पूर्ण न करू शकल्याचे कळते!
मंत्रीपदावर विराजमान होताच अवघ्या सहा महिन्यातच ताईंवर महिला व बालविकास खात्यातील चिक्की खरेदीच्या टेंडरमध्ये 206 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ताईंवर झाला, मुळात फडणवीसांच्या मंत्रिमंडळात घोटाळ्याचा आरोप होणाऱ्या पंकजाताई पहिल्या मंत्री ठरल्या! गोपीनाथराव असते तर इथंच राजकारणातून संन्यास घेतला असता, ताईंना राजीनामा द्यायला लावलं असतं, पण ताईंनी असं केलं नाही. उलट चिक्कीचा विषय थंड व्हायच्या आतच राज्य शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी मानल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेला घोटाळे व आर्थिक अपहारांनी कीड लावल्याचे उघड झाले. अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य लढ्यातील संपाला ताईंनी अन्यायकारक मेसमा कायदा लावल्याने राज्य सरकारला महिलांच्या असंतोषाचा सामना करावा लागला! टी एच आर खरेदीतही 7200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, मोबाईल खरेदीतील उघड उघड अपहार, अस्मिता योजनेचा उडालेला बोजवारा व सॅनिटरी नॅपकिन खरेदीतही घोटाळा, या व अशा अन्य आरोपांनी ताईंकडील खाते कधी एक एक कमी होत गेले कळलंच नाही! यांसह अशा अनेक चर्चा त्यावेळी कट्ट्यांवर रंगल्या! फडणवीस साहेबाच्या या पॉलिसीमुळे एकेकाळी पहिल्या पाच मध्ये स्थान असलेल्या पंकजाताई मुख्य वक्ते यायच्या अगोदर उरकून घ्यायच्या लिंबू टिम्बु भाषणांच्या यादीत विस्थापित झाल्या.
ताईंनी ‘मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री!’ असे सातत्याने म्हणत पक्षांतर्गतच आपली थेट फडनवीसांशी स्पर्धा असल्याचा जाहीर देखावा उभा केला. फडणवीसांनी 2017 मध्ये ताईंच्या दसरा मेळाव्याला प्रशासकीय परवानगी नाकारणे, पंकजाताईचे कट्टर विरोधक व परळीत प्रतिस्पर्धी असलेल्या धनंजय मुंडे यांना वारंवार मदत करणे, विनायक मेटे यांसारख्या ताईविरोधी घटकांना शक्ती देणे, कॅबिनेट व राज्यमंत्री पदे देणे, त्यांच्या कार्यक्रमातून ताईंना निघून जायची वेळ येणे अशा एक ना अनेक वेळा रिंगण दाखवले!
*एकीकडे 11000 कोटींचे रस्ते जिल्ह्यात केल्याचे राज्यभर सांगणाऱ्या ताईंना परळीहून अंबाजोगाईला जाणारा 15-20 किलोमीटरचा रस्ता का पूर्ण करता आला नसावा याचे कारण त्या सांगू शकल्या नाहीत! त्यासोबतच 800 कोटींचा वार्षिक नफा असलेल्या रेडिको बेव्हरेजेस या मद्यनिर्मितीच्या कंपनीच्या मालक असलेल्या पंकजाताईंना स्वतःच्या मतदारसंघात स्वतः चेअरमन असलेल्या वैद्यनाथ कारखाण्यात शेतकऱ्यांचे उसाचे बिल अनेक महिने होऊनसुद्धा का देता आले नाही, यावरही त्यांच्याकडे उत्तर नाही! अगदी निवडणुकीच्या तोंडावर गोपीनाथरावांनी आशिया खंडात पहिल्या क्रमांकाचा नावलौकिक मिळवुन दिलेल्या वैद्यनाथ कारखान्यात कर्मचाऱ्यांना पगार व पीएफ मिळत नाहीत म्हणून कुटुंबियांसह उपोषणाला बसायची वेळ आली! ताईंनी या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांना अगदीच वाऱ्यावर सोडल्याने त्यांचे भयंकर हाल सुरू आहेत. “पालक” म्हणवणाऱ्या मंत्री असलेल्या पंकजाताई याबाबतीत एवढ्या निष्ठुर झाल्या की अनेक वर्षे कारखान्यात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची व प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी त्यांच्यावर विरोधीपक्षांकडून प्रेरित असण्याचा आरोप करू लागल्या. परळीतील काही जाणकारांनी तर हा अंबाजोगाई रस्ता व इतिहासात काळा दिवस म्हणून नोंद झालेले वैद्यनाथ कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे उपोषण हेच दोन मुद्दे पंकजाताईंच्या आगामी विधानसभेत पराभवाची कारणे ठरू शकतात असे भाकीत केले आहे!*
एकीकडे आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असे भासवुन एका विशिष्ट समाजातील काही लोकांना भावनिक करून मतं मिळवण्यात ताई लोकसभेला यशस्वी झाल्या खऱ्या, परंतु परळीच्या विधानसभेला हे आभासी विकास व आकडेवाऱ्या पचनी पडतील असे वाटत नाही, मुळात पंकजा ताईंचे काही परळी बाहेरील समर्थक सोडता तसे त्यांच्या टीमलाही वाटत नाही! ताईंच्या पक्षातील लोप पावत चाललेल्या महत्वाने नाशिक मध्ये तर चरमसीमा पार केली, फडणवीस- मोदी येईपर्यंत लोकांना खिळवून ठेवणारे कमी महत्वाचे (ग्रामीण भाषेत लिंबू – टिम्बु) भाषण ताईंचे ठेवले, मोदी आल्यानंतर ताई किंवा गोपीनाथरावांचे नावही घेतले नाही जे विशेष! त्यातच पंकजाताईंनी दसरा मेळाव्याची लगबग सुरू केली आहे. मेळावा ऊर्जा, प्रेरणा देत असला तरी यावेळी मतं मिळवुन देणार नाही हे नक्की, त्यामुळे राज्यात नव्हे तर स्वतःच्या जिल्ह्यातही आमदार व कार्यकर्त्यांच्या बॅनर वर ताई जागा मिळवू शकल्या नाहीत! एकूणच ताईंच्या राजकीय मोठेपणाच्या गप्पा ह्या अर्थहीन उठाठेवी आहेत असं म्हणावं लागेल!