महाराष्ट्र

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी


राज्यातील निरिक्षणाखालील सर्व 91 प्रवासी कोरोना निगेटिव्ह

– आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 26 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या नवीन सूचनेनुसार चीनसह हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द.कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या 10 देशातील प्रवाशांसोबतच इराण आणि इटलीतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि.25 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 441 विमानांमधील 53 हजार 981 प्रवासी तपासण्यात आले आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 304 प्रवासी आले आहेत. त्यापैकी 225 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 91 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व 91 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 88 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या एक जण पुणे येथे तर दोघे मुंबईत भरती आहेत. राज्यात एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

अजय जाधव/वि.सं.अ./26/02/2020

Most Popular

To Top