महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा


मुंबई, दि. ६ : महाड दिवाणी न्यायालयाची इमारत ब्रिटीश काळातील असून या इमारतीस १८८ वर्ष पूर्ण झाली आहेत. नवीन इमारत बांधकामासंदर्भात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महाड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीसाठी पोलीस लाईन येथील जागेवर ही नवीन प्रस्तावित इमारत उभारण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक त्या परवानग्या घेऊन इमारत बांधकामाची प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच माणगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या उपलब्ध इमारतीसंदर्भात  आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, श्रीवर्धन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम ऐतिहासिक इमारतींच्या धाटणीत कसे करता येईल याचा आराखडा सादर करण्यात यावा.

महाड येथील श्री.विश्वेश्वर देवस्थान (ट्रस्ट) बाबत प्रकल्पासंदर्भात समिती गठित करून त्यामध्ये विश्वस्त मंडळातील सदस्यांचा समावेश करणे.

कारीवणे ता. रोहा येथील जलसंधारण कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी याबाबतही आढावा घेण्यात आला. उपलब्ध नैसर्गिक पाण्याच्या साठ्याची जपणूक करण्यासाठी पाच बंधारे करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, कृषी,विधी व न्याय, बांधकाम, गृह आदि विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

Most Popular

To Top