महाराष्ट्र

नागरिकांनी गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन


राज्यातील निरीक्षणाखालील २२९ प्रवासी कोरोना निगेटिव्ह     

मुंबई,दि.७: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात होणारी गर्दी टाळण्याचे आवाहनदेखील नागरिकांना करण्यात येत आहे. सध्या राज्यात निरीक्षणाखाली १५ जण आहेत. २३० जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

        
मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर  ७९३ विमानांमधील  ९६ हजार ४९३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व कोरोनाबाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावरदेखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५३२ प्रवासी आले आहेत. 

         

दिनांक १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत २४२ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी  २२९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २४५ प्रवाशांपैकी २३० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या  १२ जण मुंबईत तर  ३ जण  पुणे येथे   भरती आहेत. 
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे –

o वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

 o इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते. 

o बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे. 

o  या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये कोरोना आजारसदृश लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. 

o याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास प्रवाशाने स्वतःहून आरोग्य विभागात कळविण्याबाबत देखील सूचित करण्यात आले आहे.

o  या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. 

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४

 ******

अजय जाधव..७.३.२०२०

Most Popular

To Top