महाराष्ट्र

नवीन महिला अत्याचारविरोधी कायद्यात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक शिक्षेची तरतूद करणार – गृहमंत्री अनिल देशमुख


चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

मुंबई, दि. 11: महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचाही (चाईल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असून आतापर्यंत 125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. श्री.देशमुख म्हणाले, चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असून राज्यात महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी दि. 18 डिसेंबर 2019 पासून राज्यभरात ‘ऑपरेशन ब्लॅक फेस’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली असून देशभरात अशा स्वरूपाच्या करवाईमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.

      

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन (एनसीएमईसी- यूएसए) ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था समाजमाध्यमांवरील अश्लील व बाललैंगिक अत्याचाराच्या चित्रफिती आदींची (पोर्नोग्राफिक व्हिडीओ) माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम आदी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर’ (ईएसपी) यांच्या सहकार्याने एनसीआरबीला पुरविते. एनसीआरबी ही माहिती संबंधित राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना कारवाईकरिता पुरविते.

एनसीआरबीने जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील बाललैंगिक अत्याचारासंदर्भातील 1 हजार 680 ध्वनीचित्रफितींची माहिती महाराष्ट्र सायबर कार्यालयास दिली. त्यानंतर दि. 18 डिसेंबर 2019 रोजी या ध्वनीचित्रफितींची माहिती राज्यातील 10 आयुक्तालये आणि 29 जिल्हा घटकांना देण्यात आली. त्याविरोधी कारवाईसाठी ऑपरेशन ब्लॅक फेसराबविण्यात आले. आतापर्यंत चाईल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात राज्यात 125 गुन्हे दाखल करण्यात आले असून 40 आरोपींना अटक करण्यात आली. भा.दं.वि. कलम 292 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या (पोक्सो ॲक्ट) कलम 14, 15 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अ आणि 67 ब अन्वये ही अटक करण्यात आली आहे.

अशा स्वरूपाचे अभियान एनसीआरबीच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत केलेल्या कारवाईत देशात महाराष्ट्राने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्य आहे.

महिला तसेच मुलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सायबरमार्फत यासंदर्भात दिनदर्शिका तसेच पुस्तिका तयार करुन शाळा, महाविद्यालयांमध्ये वितरित करण्यात आली. याशिवाय सावित्रीबाई फुले जयंतीदिनी संपूर्ण राज्यात महिला व मुलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सायबर सेफ वुमनहे अभियान राबविण्यात आले. पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरुनही यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे.

 ‘ऑपरेशन ब्लॅक फेसअंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे तसेच करण्यात येणाऱ्या कायद्यामुळे भविष्यात बालकांवरील लैगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती (चाईल्ड पोर्नोग्राफी) (व्हिडीओ) सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर निश्च‍ितच आळा बसेल, असेही श्री. देशमुख म्हणाले.

या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य ॲड.आशिष शेलार, योगेश सागर, राम कदम, रईस शेख यांनी सहभाग घेतला.

0000

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि. 11.3.2020    

Most Popular

To Top