महाराष्ट्र

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहनराजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न
मुंबई, दि. 13 : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व जगाने योग स्वीकारलेला असताना महिलांनी थोडा वेळ स्वत:च्या आरोग्यासाठी द्यावा, योगासने करावीत, योग्य आहार घ्यावा तसेच वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करून स्वतःला सुदृढ ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज. जी. समूह रुग्णालये व वॉकहार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे वाळकेश्वर परिसरातील महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. 


ज. जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, अनेकदा महिलांचे आजार सहज बरे होण्यासारखे असले तरीही त्या संकोचामुळे चाचणी करून घेत नाहीत. हे त्यांनी टाळावे.

कोरोनाबद्दल सर्वत्र पसरलेली भीती अनावश्यक आहे. नियमितपणे हात धुण्याची सवय लावणे तसेच स्वतःची प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याचे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी संगितले. शिबिरात वाळकेश्वर परिसरातील २०० हून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

शिबिराच्या उद्घाटनाला आमदार ॲड.आशिष शेलार, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डॉ संजय सुरासे, डॉ. इंद्रायणी साळुंके व अनेक वैद्यकीय चिकीत्सक तज्ज्ञ उपस्थित होते.

Most Popular

To Top