महाराष्ट्र

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड

तळागाळातील लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडणारा, मातीशी जोडलेला माणूस मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14 : तळागाळातील आणि आदिवासी विभागातील लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडतांना त्यावरील उपाययोजना सुचविणाऱ्या नरहरी झिरवाळ यांची मातीशी जोडलेला माणूस अशी ओळख आहे. त्यांचा सरपंच ते विधानसभेच्या उपाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे. त्यांच्या सकारात्मक भुमिकेतून आणि कार्यकौशल्यातून ते सामान्यांना न्याय देतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या नरहरी सिताराम झिरवाळ यांना अभिनंदन करताना व्यक्त केला.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी सिताराम झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. सदस्य डॉ. अशोक उईके यांनी अर्ज सादर केला होता. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य चंद्रकांत पाटील आणि डॉ. अशोक उईके यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि डॉ. अशोक उईके यांनी अर्ज मागे घेतला. यांचेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, नाशिक येथील वंचित आदिवासी भागातील जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या श्री. झिरवाळ यांनी विविध समस्यांना आजतागायत वाचा फोडली आहे. त्यांनी सरपंच पदापासून समाजाच्या विकासाचा ध्यास घेतला. पंचायत राज संस्थेत सरपंच, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भुषविली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे हा त्यांच्या कामाचा गाभा असल्याने त्यांचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यांची राजकीय कारकीर्द समाजकारणाशी जोडली गेली आहे. त्यांना वाचन व कीर्तनाची आवड, कीर्तनकार सन्मार्गाची वाट दाखवतो. वाचन चळवळ विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या कार्यकौशल्यातून या नव्या भुमिकेला ते न्याय देतील. जनकल्याणाची तळमळ आहेच. आता या पदाच्या भुमिकेतून ते अधिक सकारात्मक दृष्टीने पाहतील. त्यांच्या यशाची कारकीर्द वाढत राहो असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्री. झिरवाळ  यांना शुभेच्छा दिल्या.

लोकांच्या भावनाशी एकरूप असणारा सहकारी – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शासकीय नोकरी सोडून व्यवसाय उद्योगांकडे श्री. झिरवाळ  वळले होते. मात्र, एमआयडीसीत बिगारीचे काम करताना त्यांना सामान्यांचे कष्ट, दु:ख जाणवले त्यांची जाण त्यांना आजही आहे. 2004, 2014 आणि 2019 या कालावधीतील निवडणूकीत त्यांची आमदार म्हणून निवड झाली. नांगर भरणारा शेतकरी उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्याचा आनंद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांच्या पेहेरावाचे वैशिष्ट आणि आदरही श्री. पवार यांनी यावेळी अभिनंदनाच्या भाषणातुन व्यक्त केला.

अतिशय संयमी आणि जनतेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उपाध्यक्षपदाची उंची मिळाली असल्याचे मत यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात व्यक्त केली.

आदिवासी, गोरगरिबांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गावातील सरपंच पदापासून ते विधानसभेच्या उपाध्यक्ष पदापर्यंत नरहरी झिरवाळ यांनी मजल मारली. हीच खरी आपल्या लोकशाहीची ताकद आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच हे शक्य झाले. झिरवाळ हे आदिवासी गोरगरिबांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे असे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केले.

सभागृहाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास पात्र होण्याचा प्रयत्न करीन. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्ष या दोन्ही बाजूंना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेन अशी खात्री देतो अशी ग्वाही, नवनिर्वाचित विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली. राज्यातील सर्वसामान्य शेतकरी, मजूर यांच्या ज्या अपेक्षा सभागृहाकडून  आहेत त्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू असेही उपाध्यक्ष झिरवाळ  यांनी सांगितले.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

0000

श्रद्धा मेश्राम/14.3.2020

Most Popular

To Top