महाराष्ट्र

केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थींना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई, दि. 26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेलं 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात या योजनेतील सर्व लाभार्थींना व्यवस्थित लाभ मिळेल यासाठी राज्य शासन संपूर्ण प्रयत्न करेल. यादृष्टीने राज्यातील यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप, उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस, स्वस्त धान्य दुकानात रास्त भावाने अन्नपुरवठा, शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांची रक्कम,  यासारख्या निर्णयांमुळे  त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत राहण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गरीब, वृद्ध,  दिव्यांग विधवा महिला यांच्या जनधन खात्यांमध्ये एक हजार रुपये जमा करण्याचा, मनरेगा कामांवरील मजुराना दरदिवशी 200 रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय योग्य आहे. केंद्र शासनाचे हे मदतीचे पॅकेज लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य शासन प्रभावीपणे पार पाडेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.. या युद्धात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची भुमिका खूप मोलाची आहे. त्यांच्यासाठी विम्याचे कवच देऊन केंद्र शासनाने यंत्रणेत काम करणाऱ्यांना बळ दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एकीच्या बळावर आपण विषाणुला देशातून हद्दपार करण्यात नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतांना  मुख्यमंत्र्यांनी गरजेनुसार केंद्राने अशाच प्रकारे राज्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

Most Popular

To Top