महाराष्ट्र

सीमा बंदीमुळे अडकलेल्या नागरिकांमध्ये आवश्यक सोयीसुविधा दिल्याने समाधान

निवारागृहातील नागरिकांसाठी प्रशासनाची संवेदनशीलता

 

 

‘कोरोना (कोव्हिड – 19)’…..मनामध्ये मृत्युचे भय निर्माण करणारा विषाणू. त्यामुळे जगण्यासाठी बाहेर पडण्याऐवजी या विषाणूने नागरिकांना घरात राहण्यास बाध्य केले. एरवी लोकं पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडत असतात. मात्र या विषाणूच्या संसर्गामुळे सर्व जग थांबले असून दैनंदिन व्यवहार बंद पडले आहेत. परिणामी संपूर्ण देशात, राज्यात आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्याने ‘सातच्या आत घरात’ असे नाही तर ‘चोवीस तास घरात’ राहण्याचे निर्देश शासन आणि प्रशासनाने दिले आहेत. या निमित्ताने जगण्यासाठी लोकंही घरात बसल्याचे प्रथमच दिसून येत आहे.

         

संचारबंदीमुळे कलम 144 ची कडक अंमलबजावणी होत आहे. नागरिक आहे तेथे अडकून पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे रहिवाशी इतर राज्यांमध्ये व इतर जिल्ह्यातसुद्धा थांबले आहेत. तर इतर राज्यातील व इतर जिल्ह्यातील रहिवाशी यवतमाळ जिल्ह्यात अडकून पडले आहेत. या अडकून पडलेल्या नागरिकांची संपूर्ण जबाबदारी पालक म्हणून यवतमाळ जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची तसेच बाहेर निघता येत नसल्यामुळे त्यांना मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अतिशय संवेदनशीलपणे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या नेतृत्वात प्रशासनाने उचलली आहे. आजघडीला बाहेरच्या राज्यातील व इतर जिल्ह्यातील यवतमाळमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने 37 निवारागृहे सुरू केली आहेत. यात जवळपास 3 हजार नागरिकांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. अन्यत्र नऊ सामुदायिक किचन सुरू करण्यात आले आहेत.


           

जिल्हा प्रशासनातर्फे सर्वाधिक पाच तात्पुरत्या निवारागृहाची सोय पुसद तालुक्यात (थांबलेले एकूण नागरिक 435) करण्यात आली आहे. यानंतर प्रत्येकी चार निवारागृहे यवतमाळ (84) आणि कळंब (224) येथे सुरू करण्यात आली आहेत. मारेगाव (74), दारव्हा (25), नेर (13) आणि महागाव तालुक्यात (15)  प्रत्येकी 3 निवारागृहे, बाभुळगाव (9), आर्णि (14), घाटंजी (18), दिग्रस (2), उमरखेड तालुक्यात प्रत्येकी दोन निवारागृहे तर केळापूर (128)  आणि झरीजामणी (1929)  येथे एक निवारागृह उभारण्यात आले आहेत. कंसातील आकडे निवारा गृहातील लोकांचे आहेत. जिल्ह्यातील 37 निवारागृहात एकूण 2970 नागरिक थांबले आहेत.


           

केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील रहिवासी सुरेश रेड्डी कैतमकर यांनी त्यांची शाळा रेड्डी कॉन्व्हेंट निवारागृह म्हणून प्रशासनाला उपलब्ध करून दिली आहे. एकूण 80 खोल्या असलेल्या या शाळेत बाहेर राज्यातील 128 नागरिक थांबविण्यात आले आहेत. येथे आलेल्या लोकांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शाळेत थांबलेल्या लोकांकरीता स्वतंत्र बेड देण्यात आले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरओची व्यवस्था. 128 नागरिकांसाठी येथे शौचालय व बाथरूमची संख्या तब्बल 200 आहे. नागरिकांच्या प्रत्येक खोलीसमोर चप्पल स्टँड असून मोठ्या हॉलमध्ये टेबल-खुर्चीवर जेवणाची व्यवस्था आहे. तसेच खेळण्याकरीता प्रशस्त मैदानसुद्धा उपलब्ध आहे. एवढेच नाही तर रुममधील प्रत्येकाकरीता वेगळी साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, बिस्कीट पुडा, डोक्याला लावायचे तेल, पिण्याच्या पाण्याची बॉटल प्रशासनाने दिली आहे. तसेच बातम्या बघण्याकरीता प्रोजेक्टरची सुविधा, जेवणाकरीता स्वतंत्र भोजन कक्ष, मोबाईलकरीता वाय-फाय आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या मार्गदर्शनात नियोजनाची सर्व व्यवस्था सहायक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, नियंत्रण अधिकारी तथा केळापूरचे तहसीलदार सुरेश कव्हळे, नोडल अधिकारी आर.एस. मोट्टेमवार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, वैद्यकीय कर्मचारी आदी उत्तमरित्या बघत आहेत.

छिंदवाडा जिल्ह्यातील जमूनिया येथील विनयकुमार नागोद यांनी सांगितले की, ते काही कामासाठी बंगलोरला गेले होते. परतताना गाडी अडविण्यात आली. सुरुवातीला केळापूर आणि नंतर पाटणबोरी येथे पोहोचलो. या निवारा गृहात आमची चांगली सोय आहे. माझ्या घरी बायको आणि दोन छोटी मुले आहेत. माझे त्यांच्याशी बोलणे होते. या निवारा गृहातील सुविधा पाहून मला त्यांना येथे बोलवावेसे वाटते.

राजस्थानातील बिचवा या गावातील इशाद अहमद यांनी सांगितले की, ते हैद्राबाद येथून रिकामी गाडी घ्यायला आले होते. त्यांना वाटेत अडविण्यात आले आणि नंतर निवारा गृहात आणण्यात आले. त्यांच्या सोबत त्यांचे दोन भाऊ आहेत. आमची कुणाचीही काही अडचण नाही असे ते म्हणाले. आम्ही निवारा गृहाच्या मैदानावर वेळ घालवतो, असे सांगून त्यांनी येथे सर्वसोयी चांगल्या आहेत. मात्र घरी बायको आहे, तिची डिलेव्हरी अपेक्षित आहे. त्यामुळे घरी लवकर जाण्याची इच्छा आहे, असे सांगितले.

– राजेश येसनकर,

जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ

Most Popular

To Top