सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशंसनीय कामगिरी
मुंबई, दि. १२ : पुणे येथील ससून रूग्णालयाच्या नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे प्रत्यक्ष काम अवघ्या ११ दिवसांत पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने नवा विक्रम रचला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात ते म्हणाले, ससून रूग्णालयाची ही ११ मजली इमारत बांधून जवळपास तयार होती. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या इमारतीत अतिदक्षता व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी हे विशेष रूग्णालय उभारण्यामध्ये सर्वात मोठे आव्हान मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे होते. हे काम ‘हाफकीन’कडून केले जाते. मात्र कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे त्यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण असल्याने ससून रूग्णालयाच्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील ही नवीन आव्हानात्मक जबाबदारी विभागाने स्वीकारली व अवघ्या ११ दिवसांत हे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. सामान्यतः अशा कामांची निविदा काढण्यापासून ते प्रत्यक्ष कामाची पूर्तता होण्यासाठी ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ससून रूग्णालयातील मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम तातडीने व युद्धपातळीवर करण्याची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने रात्रंदिवस काम करून हे काम पूर्ण करून घेतले. द्रवरूपी ऑक्सिजन वायूत रूपांतर करून पुरवठा करण्याच्या कामाचा हा जागतिक विक्रम असल्याचे या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला मदत करणाऱ्या अॅटलास कॉप्को या बहुराष्ट्रीय कंपनीने म्हटले आहे.
या कामासोबतच ऑपरेशन थिएटर आणि नजीकच्या इन्फोसिस इमारतीत तळमजल्यावर आयसीयू कक्ष व मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत कोरोना लॅब उभारण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. ससूनच्या नव्या इमारतीत तळमजला, चौथा, पाचवा, सहावा, सातवा मजला पूर्ण करून १० एप्रिल रोजी हस्तांतरीत करण्यात आला आहे. याठिकाणी ५० खाटांचे आयसीयू कक्ष आणि १०० खाटांचा विलगीकरण वॉर्ड रविवारी सायंकाळपासून औपचारिकपणे रूग्णसेवेला प्रारंभ करणार असल्याचे मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी सांगितले. हे काम विक्रमी वेगाने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधितांची प्रशंसा केली आहे.