महाराष्ट्र

वाचन करुन घरातच जयंती साजरी करा – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

मुंबई, दि. 13 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस वाचन दिन म्हणून घरातच साजरा करावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

श्री. भुजबळ म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला. बौद्ध धम्माची दीक्षा दिली. राज्यात कोरोनाचे वाढते संकट बघता नुकताच 11 एप्रिलला आपण महात्मा फुले यांचा जन्मदिवस एक ज्ञानाचा दिवा लावून घरात साजरा केला. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा अतिशय थोर असे ज्ञानी पुरुष होते. अनेक पुस्तक त्यांनी लिहिली आणि उपदेश केला की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांची ही शिकवण डोळ्यासमोर ठेवून 14 एप्रिलला निश्‍चितपणे त्यांनी जी अनेक पुस्तके लिहिली त्यांचे वाचन आपण घराघरात करूया व त्यांनी केलेला उपदेश पुन्हा एकदा आठवूया.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो ते यावेळी आपल्याला करता येणार नाहीत. घरातच आपण हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा करूया. केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला सहकार्य करुन बाहेर न जाता घरातच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करुया, असे आवाहनही श्री. भुजबळ यांनी  केले आहे.

Most Popular

To Top