महाराष्ट्र

राज्यात ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ


मुंबई .दि.15 :-  राज्यातील  52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 15 एप्रिल 2020 या  पंधरा  दिवसात  राज्यातील 1 कोटी 35 लाख 54 हजार 441 शिधापत्रिका धारकांना तब्बल 43 लाख 59 हजार 798 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.      

राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 51 हजार 43 क्विंटल गहू, 14 लाख 28 हजार 545 क्विंटल तांदूळ, तर  17 हजार 121 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 6 लाख 68 हजार 622 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 3 एप्रिलपासून पात्र रेशनकार्डधारकांना मोफत तांदूळ वितरित करण्यात येत असून 10 लाख 80 हजार 210 क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.  या योजनेसाठी 35 लाख 820  क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिलसोबतच मे आणि जूनमध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Most Popular

To Top