महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात राज्यात २०१ गुन्हे – महाराष्ट्र सायबरची माहिती

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 26 गुन्हे दाखल

                                    

मुंबई दि.15-  कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने राज्यात 201 तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 26 गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

     

राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे.

     

महाराष्ट्र सायबर विभाग टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.  

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 14 एप्रिल 2020 पर्यंत 201 गुन्हे दाखल झाले आहेत . त्यामध्ये सर्वाधिक 26 गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदविले आहेत. कोल्हापूर 15, जळगाव 13, पुणे ग्रामीण 11, मुंबई 10, सांगली 10,जालना 9, नाशिक ग्रामीण 8, सातारा 7, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 6, नागपूर शहर 5, सिंधुदुर्ग 5, ठाणे शहर 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, लातूर 4, गोंदिया 4, सोलापूर ग्रामीण 5, सोलापूर शहर 3. नवी मुंबई 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1, धुळे 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

     

या सर्व गुन्ह्यांचे  विश्लेषण असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 99 गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करण्यात आले.   टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 3 तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत .अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 37 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 37 आरोपींना अटक केली आहे.

नवी मुंबई -कोपरखैरणे

 नवी मुंबई येथील कोपरखैरणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अज्ञात इसमाने भारतीय झेंड्याचा अवमान करणारे छायाचित्र इंस्टाग्रामवर अपलोड करून भारत  देशाबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला आहे. त्याबद्दल अज्ञात इसमाविरुद्ध कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावधानता बाळगा

कोरोना महामारीच्या काळात सामान्यांनी  घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायला अडचण होऊ नये याकरिता सदर हप्ते 3 महिन्यांसाठी स्थगित करण्याचे आवाहन भारतीय रिजर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना केले होते . काही सायबर गुन्हेगार सदर आवाहनाचा गैरफायदा घेऊन सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. सामान्य लोकांना एक एसएमएस पाठवून सर्व बँक खात्याचे डिटेल्स म्हणजेच खाते क्रमांक ,डेबिट/क्रेडिट कार्डसचा तपशील व पिन नंबर इत्यादी एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावर पाठवायला सांगत आहेत . खातेधारकांनी सदर माहिती पाठविल्यावर थोड्या वेळात एक ओटीपी येतो व तो माहिती करून घेण्यासाठी एक कॉल येतो व समोरची व्यक्ती असे भासविते की, सदर व्यक्ती त्या बँकेतील स्टाफच आहे व तो ओटीपी घेतात . थोड्या वेळाने खातेधारकाला बँकेचा एसएमएस येतो की त्याच्या खात्यातून काही रक्कम डेबिट होऊन दुसऱ्या कोणत्यातरी अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाली आहे. 

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना असे विनम्रपणे आवाहन करते की जर असा काही माहिती मागणारा एसएमएस आला तर आपण आपली माहिती पाठवू नये कारण तुमचे कर्ज असणाऱ्या बँकेकडे तुमचा सर्व तपशील आधीपासून उपलब्ध असतोच व असा एसएमएस आल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करून खातरजमा करावी .तसेच आपण जर चुकून असे फसविले गेले असाल तर आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर माहिती द्यावी व पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करावी. तसेच या गुन्ह्याची नोंद www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर(website ) पण करावी.

Most Popular

To Top