महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात २१८ सायबर गुन्हे दाखल, ४५ आरोपींना अटक

महाराष्ट्र सायबरची माहिती

मुंबई दि. 16- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात 218 गुन्हे दाखल झाले आहेत तर पंचेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या 218 गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी 8 गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.


दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये बीड 26, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 15, जळगाव 13, मुंबई 12, सांगली 10,जालना 9, नाशिक ग्रामीण 9, सातारा 8, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 7, ठाणे शहर 6, नागपूर शहर 5, सिंधुदुर्ग 5, नवी मुंबई 5, सोलापूर ग्रामीण 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, लातूर 4, गोंदिया 4, सोलापूर शहर 3, रायगड 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1,धुळे 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .


 यात आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 102 गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 71 गुन्हे, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 2 गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत . तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 38 गुन्हे दाखल झाले आहेत.


नाशिक ग्रामीण

नाशिक ग्रामीण अंतर्गत सटाणा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . सदर आरोपीने एका लिंकवरील खोट्या बातमीद्वारे “कोरोनाच्या भीतीमुळे मालेगावमधील लोकांचे लोंढे सटाण्यात येणार” अशा मजकुराची बातमी व्हाट्सअप व अन्य समाज  माध्यमांवर पसरवून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला.
 

ठाणे शहर-भिवंडी

ठाणे शहर व भिवंडी मध्येही अन्य एका गुन्ह्यांची नोंद करण्यात आली . सदर आरोपीने व्हाट्सअप व  समाजमाध्यमांचा वापर करून कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती पसरवून त्याद्वारे कोरोना महामारीचा प्रसार रोखणासाठी सुरु असलेल्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला .


नागरिकांना आवाहन

सोशल मीडियाचा (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी )वापर जपून व तारतम्य बाळगून करावा .एखादी बातमी किंवा माहिती तुमच्या वाचनात किंवा पाहण्यात आली तरी सदर बातमीची व माहितीची खात्री  व सत्यता पडताळूनच त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी . तसेच अशा पोस्ट्सवर आपल्या प्रतिक्रिया चिथावणीखोर नाहीत याची खात्री करावी व आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास व चुकीचा अर्थ निघून कोणत्या ही कायद्याचे किंवा सरकारी आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी . 

कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सअप किंवा अन्य समाज माध्यमांवर पसरवू नयेत,व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.

     

केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये . असे आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे.

Most Popular

To Top