महाराष्ट्र

शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडून मंत्री परदेश दौऱ्यावर

शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडून मंत्री परदेश दौऱ्यावर

मुंबई : राज्यातल्या शेतक-यांची काळजी असेल तर शिवसेनेने अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरु करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी  शिवसंपर्क अभियान सुरु करण्याच्या शिवसेनेच्या घोषणेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी आहेत. त्यांनी शेतक-यांचे प्रश्न सोडवावेत.

ते सोडवणे त्यांना जमत नसेल तर त्यांनी अगोदर सरकारमधून बाहेर पडावे आणि मग आंदोलने करावीत. विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

कर्जमाफी देण्यासाठी सरकार कडून केली जाणारी टाळाटाळ आणि तूर खरेदीबाबत फसलेले व्यवस्थापन यामुळे राज्यातील शेतक-यांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतक-यांच्या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये म्हणून उध्दव ठाकरेंनी शिवसंपर्क अभियानाची घोषणा केली आहे. शेतक-यांच्या दुरावस्थेला भाजप इतकीच शिवसेनाही जबाबदार आहे.

सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू, असे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांना दिले होते.  शिवसेना सत्तेत होऊन अडीच वर्ष झाली, तरीही राज्यातल्या शेतक-यांचा सातबारा कोरा का केला नाही ?याचे उत्तर उध्दव ठाकरेंनी द्यावे असे खा. चव्हाण म्हणाले.

राज्यात तूर उत्पादक शेतक-यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तूर खरेदी केंद्र बंद आहेत.

तूर खरेदी केंद्राबाहेर शेतक-यांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक शेतक-यांची तूर अवकाळी पावसाने भिजली आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतक-याला वा-यावर सोडून राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर  आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट परदेश दौ-यावर गेले आहेत.

तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सरकार विरोधात मोर्चे काढत आहेत. सरकार विरोधात मंत्री आंदोलन करतायेत अशी दुर्देवी परिस्थिती या राज्याच्या इतिहासात कधी आली नव्हती. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतक-यांची एवढीच काळजी असेल तर या पक्षाच्या मंत्र्यांनी अगोदर मंत्री पदाचे राजीनामे द्यावेत आणि मग संपर्क अभियान राबवावे आणि सरकारविरोधात आंदोलने करावीत आम्ही त्यांचे स्वागत करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडून मंत्री परदेश दौऱ्यावर
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top