By
Posted on
ऑनलाइन महासत्ता.
मुंबई, दि. 2 – पाकिस्तानी लष्कराच्या विशेष पथकाने भारतीय हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या सर्वच भागातून पाकिस्तानला या नापाक हरकतीबद्दल धडा शिकवण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, टि्वटरवर #ModiWeakestPMever हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे.
मोदींजी आतापर्यंतचे सर्वात कमकुवत पंतप्रधान म्हणून केलेली तलुना त्यांच्या समर्थकांना अजिबात रुचलेली नसून, टि्वटरवर मोदी समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. मोदी समर्थकांच्या मते हा पेड ट्रेंड आहे. मोदी शांत आहेत म्हणून त्यांना कमकुवत समजू नका असे समर्थकांचे म्हणणे आहे तर, 56 इंचाची छाती आता कुठे गेली ? असा सवाल विरोधक विचारत आहेत.
दरम्यान पाकिस्तानने दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला लगेचच चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यात दोन पाकिस्तानी बंकर्स उद्धवस्त झाले असून, सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी दोन भारतीय जवानांना मारले त्यानंतर या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केली.
पाकिस्तानच्या या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला.