मुख्य बातम्या

राज्य कर्जबाजारी अन् दुष्काळ असताना देखाव्यासाठी खर्च कशाला ? – धनंजय मुंडे

राज्य कर्जबाजारी अन् दुष्काळ असताना देखाव्यासाठी खर्च कशाला ? - धनंजय मुंडे

बीड दि.16……………..राज्यात दुष्काळाने हाहाकार माजवून सोडला आहे. कित्येक शेतकर्‍यांना अद्याप पिक विमा दिलेला नाही, कर्जमाफीची बोंब आहे. शेतीमालाचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. तिजोरीत प्रचंड खडखडाट आहे. अशा स्थितीत राज्याच्या ग्रामविकास खात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी उधळपट्टी सुरु केली आहे. शिर्डीत होणार्‍या आवास योजनेच्या ई-गृहप्रवेशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर माणसं जमावेत म्हणून नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, पुणे येथील लाभार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी बसेससह नाश्ता, येण्या-जाण्याची सोय करून बॅनर लावण्यावरही तेवढाच खर्च केला जात आहे. हा खर्च दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची उधळपट्टी अशा दुष्काळात केला जात असल्याने राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून पोलखोल केला आहे.
१९ तारखेला शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती दर्शवण्यासाठी आता राज्य शासनाचे ग्रामविकासमंत्रालय पुढाकार घेत असून लाटेवर स्वार असलेल्या भाजपाला मोदी लाट ओसरल्याचे अनुभव येऊ लागल्यानंतर शासकीय खर्चातून माणसे जमवण्याचा जुमला राज्य सरकारने सुरु केला आहे. मोदींच्या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्रालय तब्बल दोन कोटी रुपयांची उधळपट्टी करू पहात आहे. तसा आदेशही ग्रामविकास मंत्रालयाकडून काढला गेला आहे. लाभार्थ्यांना मोदींच्या कार्यक्रमात आणण्यासाठी बसेसची व्यवस्था केली गेली आहे.
नाशिक जिल्ह्यात २० हजार लाभार्थी असल्याने याठिकाणी चारशे बसेस ग्रामविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. अहमदनगरमधील बसेसची संख्या २४० असून औरंगाबादमध्ये ८०, बीड ४०, पुणे ४० अशा एकूण ८०० बसेसमधून ४० हजारपेक्षा जास्त लोकांना कार्यक्रमस्थळी नेण्यात येणार आहे. यावर बसेसमधील लाभार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली असून सुमारे २ कोटी रुपयांचा खर्च यावर होत आहे. सध्या राज्यात दुष्काळी स्थितीत असताना शेतकर्‍यांचं देणं देण्यासाठी पैसे नसताना राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम यशस्वी करण्याासाठी आणि लोकांना माणसे दाखवण्यासाठी राज्याचं ग्रामविकास मंत्रालय मोदींच्या कार्यक्रमावर दोन कोटी रुपये उधळपट्टी करत आहे.
बॅनरबाजीवर निरर्थक खर्च होणार आहे. याबाबत धनंजय मुंडेंनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया देताना मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच भाजपाला शासकीय खर्चाने माणसे आणावे लागत असल्याची प्रतिक्रिया देऊन ग्रामविकास मंत्रालयाचे पत्र त्यांनी ट्विट केले आहे.

Most Popular

To Top