मुख्य बातम्या

हजार प्रश्नही निरुत्तर करते बाई बोलते जेंव्हा. आव्हानांचे किती घाव झेलते बाई बोलते तेंव्हा – ज्योती भारती

हजार प्रश्नही निरुत्तर करते बाई बोलते जेंव्हा.
आव्हानांचे किती घाव झेलते बाई बोलते तेंव्हा.

ठाणे : गेल्या काही दिवसांपूर्वी नेटकरी आणि न्युज चॅनलवर एक विषय फार जोरात चालला तो म्हणजे…. ब्रा, बुब्ज आणि बाई! बाईची अंतर्वस्त्र व्हरांड्यात वाळत टाकतानाही त्यामागे एक लपवा छपवीची नियमव्यवस्था पाळणारी आपली सनातनी भारतीय संस्कृती, हेमांगी कवी सारख्या एका हरहुन्नरी अभिनेत्रीच्या तोंडून ब्रा आणि स्त्रीच्यांचे स्तन हे बेधडक शब्द ऐकुन अवाक् झाली.
कोणताही मुद्दा नव्याने समाजासमोर येतो तेव्हा सुरुवातीला तो पूर्णत्वाने परिपूर्ण नसतोच, तसा हेमांगीचाही नव्हताच. “पुरुष बघतात आणि मजा घेतात पण स्त्रियां याबद्दल जजमेंटल होतात,” हेमांगीचे हे बोल माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या वैचारिक मानसिकतेला पटले नाहीत. खरं तर आपल्या समाजाचे टीकास्त्र, एक बाई हा शरिरधर्माचा विषय न लाजता बोलतेय म्हटल्यावर आणखीनच जहरी होतात. कारण मुळात बाईचे बोलणेच समाजाला मान्य नसते. त्यामूळे त्याच छुप्या विरोधातून बोलणाऱ्या बाईवर अनेक वैचारिक हात उगारले जातातच! ज्यामध्ये तिचे चारित्र्यहनन किंवा स्त्री विशिष्ट अवयवांवरून केलेल्या अश्लील कोट्या हे मुद्दे ओघाने येतातच. त्यामुळे इथे बोलणाऱ्या स्त्रीची भूमिका स्पष्ट आणि घाव झेलायला तत्पर अशीच असावी लागते. अर्थात हेमांगीने आपली भूमिका स्पष्ट मांडून अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया झेलल्या आणि एका अवघड मुद्द्याला तोंड फोडलं याबद्दल तिचं कौतुकच!

अवघ्या महाराष्ट्राचा विचार करता सडेतोड भाषेत बोलणाऱ्या एकच बाई मला पहिल्या आणि प्रथम आवडतात त्या म्हणजे ताराबाई शिंदे! एकोणिसाव्या शतकात अवघे राष्ट्र इंग्रज सरकारच्या विरोधात असतांना ताराबाई शिंदे नामक एखादी स्त्री ‘इंग्रज सरकारचे राज्य ईश्वर राज्य असे सदोदित चिरकाल ठेवो’ अशी इच्छा व्यक्त करते; हे म्हणजे मोठे धाडसच म्हणावे लागेल. इंग्रजांनी केलेल्या भौतिक सुधारणा आणि इंग्रजांचा स्त्रीविषयक लवचिक दृष्टिकोन बघता ताराबाईंनी इंग्रजाच्या सत्तेचे खुलेआम समर्थन केले. त्यांनी स्त्रीपुरूष तुलना या ग्रंथाद्वारे केशवपनाच्या दृष्ट रूढी, पुरुषांना असणारी अनेक विवाहाची मुभा यावर त्यांनी कडाडून टीका केली. घोड्यावर बसून कोर्ट कचेरीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या ताराबाईंनी समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना आपल्या कृतीतून आव्हान दिले. त्याकाळी त्यांनी गोषा पद्धतही नाकारली.

ताराबाईंचे शब्द म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा आद्य हुंकार म्हणावा लागेल, हुंकार कशाला तो एक हाहाकारच आहे. एखादया स्त्रीने स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेत व्यवस्थेविरुद्ध बोलणे म्हणजे फार कठीण काम होते त्या काळी! म्हणजे हेच बघा की त्यानंतरच्या काळात मालतीबाई बेडेकर या स्त्रीवादी लेखिका घडल्या पण त्यांनाही विभावरी शिरुरकर या टोपण नावाने कळ्यांचे निःश्वास आणि हिंदोळ्यावर यांसारखी स्त्रीप्रधान पुस्तके लिहावी लागली.

स्त्री-प्रश्नांची मानसिक बाजू त्यांनी फार प्रभावीपणे आपल्या कथांतून माडली, प्रौढ कुमारिकांच्या मनातला मानसिक कोंडमारा, कुरूप मुलींचे लग्नाचे प्रश्न आणि त्यांची मानसिक कुचंबणा, हुंड्याचे प्रश्न , प्रेमातील पाशवीपणा, अशारीर प्रेम, बाहेरख्यालीपणा इत्यादी स्त्रीजीवाचे अनेकविध बाजूचे दर्शन घडविण्यात त्यांच्या कथा यशस्वी झाल्या. स्त्रियांचे अनेक प्रश्न स्त्रीनिष्ठ जाणिवेतून बेधडकपणे साहित्यातून मांडणे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाला कारणीभुत ठरणे हेच होते. टोपण नावाने का होईना मालतीबाई तब्बल तेरा वर्षे लिहीत राहिल्या, कालांतराने त्यांच्या साहित्यकृतींना योग्य न्याय मिळालाच. इतकेच नव्हे तर १९८१ साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते…केवढा तो सन्मान!

थोडं पुढे जाऊन जगाच्या पाठीवरचा आलेख बघितला तर लक्ष वेधून घेते ती, वयाच्या १७व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला युसुफजाई! मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिक विजेती आहे. पाकिस्तानात दहशतवादी संघटनांना तिने तीव्र विरोध केला. पाकिस्तानातल्या परिस्थितीचं भीषण चित्रण करण्यासाठी तिने एका वर्तमानपत्रात ‘गुलमकई’ या नावाने डायरी लिहिली आहे. “एक पुस्तक,एक लेखणी ,एक बालक आणि एक शिक्षक अवघे जग बदलू शकते ” हा विचार तिने मांडला. हे सगळं करत असताना मलाला, स्त्रीला कायम दुय्यम वागणूक देणाऱ्या एका देशात राहत होती हे नजरेआड करण्यासारखे नाहीच.

आज भारतासारख्या देशात शिक्षणाने आणि सांविधनिक कायद्यांनी स्त्रियांना बोलण्याचे, अन्याया विरुद्ध आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहेच तरीही ही प्रस्थापित व्यवस्था स्त्रीचे अधिकार सहजासहजी मान्य करत नाही. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांकडे कायम उपलब्धतेच्या दृष्टीने पाहिले जाते. बहुतेकदा बोलणाऱ्या स्त्रीच्या बुद्धिमत्तेवर आणि चारित्र्यावर बोट उचललं जातंच. हे समाजाला नवीन नाही. बोलणारी स्त्री ही समाजाला एखाद्या तोफेसारखीच वाटते. ती सुंदर असो, ती गृहकृत्यदक्ष असो, ती कर्तृत्ववान असो, ती अष्टपैलू असो पण ती बोलणारी अर्थात प्रश्न विचारणारी असूच नये.

कारण ज्याप्रमाणे एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिक्षित होते असं आपण मानतो त्याचप्रमाणे एक स्त्री बोलली की तिच्या मागून अनेक स्त्रिया बोलू लागतीलच. ही भावना व्यवस्थेला तडा देते. त्यातही एखादा गुप्तांगाचा विषय निघाला तर तिचं इतकं बेधडक बोलणं पचनी पडणारं नाहीच. कारण स्त्री हा तर लाजेचा पुतळा! ही आपली सांस्कृतिक समज असल्यामुळे तिचं बेधडक बोलणं लाज या संकल्पनेच्या आड येतं आणि तेच तिला चारित्र्यहीन ठरवायला पुरेसं होतं.

स्त्री म्हणून तिला काही विशिष्ट अंग आहेत. ते नाजूक आहेत की भक्कम हे तिचं तिला ठरवू द्या. एक स्त्री म्हणून तिला काही स्त्री विशिष्ट अनुभवही आहेत त्याबद्दल ती चांगलं किंवा वाईट जे काही बोलते ते निदान ऐकुन घेण्याचं तरी औदार्य दाखवा कारण हाच प्रश्न तुमच्या बहिणीच्या, आईच्या किंवा बायकोच्या बाबतीतला असू शकतो ज्याबद्दल कदाचित तुम्ही अनभिज्ञ असाल.

हा आता या बोलणाऱ्या स्त्रीयांना फक्त पुरुषी व्यवस्थाच प्रश्न विचारते असे नाही तिथेही स्त्री वर्ग आहेच. तो स्त्रीवर्ग पूर्णतः आणि कायम चुकीचा असतो असेही माझे मत नाही पण इतर स्त्रियांनी त्याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवतांना आपले मत हे प्रस्थापित पुरुषी व्यवस्थेचे समर्थन करणारे तर नाही ना…?किंवा दुसऱ्या स्त्रीबद्दल बोलतांना आपण फारच उथळ प्रतिक्रिया तर देत नाही आहोत ना …? किंवा केवळ समोरच्या स्त्रीच्या कर्तृत्वाची, बोलण्याची अथवा प्रसिद्धीची इर्षा वाटून तर आपला मुद्दा मांडत नाही आहोत ना ? हे तपासून बघणे फार गरजेचे आहे. कारण जर इथे एक स्त्री म्हणून आपण दुसऱ्या बोलणाऱ्या स्त्रीची मानसिकता जोखून घ्यायला कमी पडलो तर इतिहासाप्रमाणेच आजही “स्त्री हीच स्त्रीची शत्रू आहे” अशा टिप्पण्या तथाकथित संस्कृती रक्षक करतच राहतील. आणि त्याला पूर्णतः आपणच कारणीभूत असू.

एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारी लेखिका ताराबाई शिंदे पासून ते आजच्या एकविसाव्या शतकातील नोबल पारितोषिक जिंकणाऱ्या मलाला युसूफझाई पर्यंतच्या अगणित बोलणाऱ्या स्त्रियां आपणास माहित आहेतच. त्यांना समाजाच्या अनेक स्तरातून विरोध झालाच, पण त्यांनी अनेक जाचक सोशल चौकटी मोडल्या हे जास्त कौतुकास्पद आहे. नाही का ?

 

Most Popular

To Top