लांडेवाडी येथील जनता दरबारात बैलगाडा मालकांसोबत शर्यतबंदी उठवण्याबाबत झाली चर्चा
आज दि.८ ऑगस्ट रोजी लांडेवाडी, ता. आंबेगाव येथील जनता दरबारामध्ये पुणे जिल्ह्यातील विविध भागातील बैलगाडा मालकांनी माझी भेट देऊन बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी आग्रही मागणी केली. यावेळी अनेक बैलगाडा मालकांनी त्यांच्या भावना माझ्यासमोर व्यक्त करत यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येउन राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता बोलून दाखवली.
यावेळी उपस्थित गाडामालकांशी संवाद साधताना म्हणालो की, बैलगाडा शर्यती हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे प्रलंबित आहे. पाच न्यायाधिशांचे खंडपीठ याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयापुढे सामाजिक दृष्ट्या महत्वाचे ट्रिपल तलाक, राम मंदिर, आरक्षण, आधार कार्ड यासारखे विविध विषय आहेत. बैलगाडा शर्यतींचा विषय प्राधान्याने खंडपीठापुढे यावा यासाठी सुप्रीम कोर्टाला याविषयी जाग आणणे गरजेचे आहे. त्याकरिता संपूर्ण देशभरात लोकप्रिय असलेले सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्यासारख्या राज्यातील अनेक विविध प्रथितयश कलाकार मंडळी, कीर्तनकार, साहित्यकार, क्रीडा, सहकार या व अन्य क्षेत्रातील मंडळींना एकत्र करून राज्यव्यापी आंदोलन उभारल्यास सर्वोच्च न्यायालयाला आपली दखल घेणे भाग पडेल. तसेच यासाठी यासाठी ठिकठिकाणी ४-५ गावे मिळून एकत्रित शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. महिनाभर वातावरण निर्मिती करून योग्य दिशेने भव्य स्वरूपाचे जन आंदोलन केल्यास सर्वोच्च न्यायालयाला आपली दखल घेणे भाग पडेल असे मत व्यक्त केले.
- राज्य व केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतींना विरोध केलेला नाही, मात्र कायदेशीर कचाट्यातून बैलगाडा शर्यत बाहेर काढणे गरजेचे आहे. सर्व गाडा मालकांच्या प्रतिनिधींनी गृहमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांची भेट घ्यावी, त्यादृष्टीने सोयीची एक तारीख निश्चित करून सर्व लोकप्रतिनिधी व गाडामालक यांची बैठक आयोजित करावी, बैठकीद्वारे आंदोलनाची दिशा निश्चित करावी अशा सूचना यावेळी मांडल्या. तसेच कुठल्याही नेतृत्वाशिवाय सर्वपक्षीयांना सोबत घेऊन हे आंदोलन व्हावे अशी भूमिका गाडा मालकांसमोर मांडली.
-
शिवाजीराव आढळराव पाटील
शिवसेना उपनेता, संपर्कप्रमुख, मा. खासदार शिरूर लोकसभा