मुख्य बातम्या

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक

पुणे कौन्सिल हॉलच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या कोविड-१९ निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याबाबत निर्देश दिले.

पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर कोराना नियमांचे पालन करुन मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे. दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट सात टक्क्यांच्या वर गेल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आज केले.

यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही याची खबरदारी प्रत्येकोने घेतली पाहीजे. पुण्यातील प्रमाण ३.३ आणि पिंपरी चिंचवड ३.५ आणि ग्रामीणचे संसर्गाचे प्रमाण ५.५ आहे. ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना सर्वांची मते विचारात घेत निर्णय घेण्यात येतात. आपल्या सर्वांची मते विचारात घेत निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच १९ ऑक्सिजन प्लाण्ट सुरू झाले आहेत, ३४ प्लाण्ट प्रस्तावित आहेत, नजीकच्या कालावधीत ऑक्सिजन प्लाण्ट गतीने सुरू होतील, जिल्ह्याला ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

हॉटेल आणि रेस्टॉरंटला ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे, प्रत्येक १५ दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त ४ वाजेपर्यंत खुले राहतील, असेही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार वंदनाताई चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार दिलीप मोहिते, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Most Popular

To Top