शिवाजी पार्कवर २८ डिसेंबरला सोनिया गांधी व राहुल गांधींच्या उपस्थितीत मेळावा !: महाराष्ट्र प्रभारी मा. एच. के. पाटील.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणनितीसाठी छाननी समितीची बैठक संपन्न.
आपत्तीग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून कोणतीच मदत नाही.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली आहे.
टिळक भवन येथे मुंबई काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक पार पडली त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते.
एच के. पाटील म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ५० मिनीटे चर्चा झाली असून जाहीरनाम्यासह निवडणुकीच्याअनुषंगाने विविध कार्यक्रमांविषयी यावेळी चर्चा झाली. महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर युती वा आघाडी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली नाही तर स्थानिक पातळीवरील समिकरणे पाहून स्थानिक नेतेच त्यासंदर्भात निर्णय घेतील. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पुन्हा एकदा लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
अतिवृष्टी व महापुराने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे परंतु या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले नाही. अजूनही केंद्र सरकारची कुठलीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. एनडीआरफची मदतही मिळालेली नाही. महाराष्ट्रावर आपत्ती कोसळली असताना पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री कुठे होते? असा सवालही एच. के. पाटील यांनी विचारला.
महाराष्ट्रावर आलेल्या आपत्तीवेळी काँग्रेस पक्षाने मोठे मदतकार्य केले असून संकटात मदतीला धावून जाण्याची परंपरा काँग्रेस पक्षाने कायम राखली आहे. आजही मुंबई काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्त कोकणवासीयांसाठी मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. आपत्तीग्रस्तांना काँग्रेसने केलेल्या या मदतकार्याची दखल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतली असून संकटकाळात महाराष्ट्र काँग्रेस व मंबई काँग्रेसने उत्तम काम केल्याचे पाटील म्हणाले.
आजच्या बैठकीला एच के पाटील यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी खासदार संजय निरुपम, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे,नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, बी. एम संदिप, वामसी रेड्डी, सोनल पटेल, संपतकुमार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.