नाशिक, ता. ३ : स्वत:ला किसान क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणविणारे आणि मुख्यमंत्र्यांशी काल रात्री उशिरा चर्चा करून संप मागे घेणाऱ्या पैठण तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आणि अन्नदाता संघटनेचे प्रवर्तक जयाजीराव सूर्यवंशी यांच्यावर आता राज्यभरातील शेतकऱ्यांकडून टिका होत आहे.
त्यामुळे त्यांनी सकाळपासून आपला फोन बंद करून ठेवला असून औरंगाबाद, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसह अन्य संपकरी शेतकरी त्यांना शोधत आहेत.
जयाजीरावांच्या खांद्यावर आम्ही मोठ्या विश्वासाने मान ठेवली, पण त्यांनी आमची मानच कापून टाकली अशी प्रतिक्रिया औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी देशदूत डिजिटलला दिली आहे. सकाळी फोन उचलला नाही म्हणून आम्ही त्यांना निषेधाचे मॅसेजेस पाठविले अशा संतप्त भावनाही या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
जयाजीरावांना एखाद्या समितीचे किंवा विधान परिषदेचे पद देण्याच्या आमिषावरूनच त्यांनी हा संप मागे घेतला आणि शेतकऱ्यांशी गद्दारी केली असेही या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तावातावाने बाजू मांडणारे आणि शेतकऱ्यांच्या संपाबाबत औरंगाबाद येथील आपल्या भव्य लॉन्सवर बैठक बोलविणाऱ्या जयाजीरावांनी आमदारकीच्या तिकीटासाठी भाजपाच्या नेत्यांकडे पाठपुरावा केल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानेही या गोष्टीला खासगीत दुजोरा दिला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणूकीच्यावेळी शिवसेना आणि भाजपाची युती तुटली तेव्हा अनेक इच्छूकांच्या अपेक्षांना आमदारकीचे धुमारे फुटले होते.
त्यात तत्कालिक शेतकरी कार्येकर्ते व मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशीही होते. त्यांनी त्यावेळेस भाजपाच्या एका प्रभावी नेत्याकडे रात्री १२च्या सुमारास तिकिटासाठी पाठपुरावा केला होता.
मात्र हा नेता त्यांना ओळखून असल्याने त्याने त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावून, आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनाच तिकिट देऊ असे खडसावले.
त्यानंतर पुढे जयाजीराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांना कुठलेही पद किंवा समिती किंवा अगदी जि.प.चेही तिकिट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलने सुरू ठेवल्याचे त्यांच्याच पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
काल मध्यरात्री संपकरी शेतकऱ्यांच्या वतीने ते मुख्यमंत्र्यांना भेटून संप मागे घेत असल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून सोशल मीडिया सूर्यवंशीच्या नावाने ट्रोलिंग सुरू झाले आहे.
मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार जयाजीरावांसारख्या नेत्यांना हाताशी धरून संप मोडण्यात आणि संपकरी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यात यश मिळाल्याची संतप्त भावना संपकरी शेतकऱ्यांनी देशदूतकडे व्यक्त केली आहे.
यासंदर्भात बाजू ऐकून घेण्यासाठी देशदूत डिजिटलने जयाजीराव सूर्यवंशी यांना वारंवार फोनद्वारे संपर्क केला, पण त्यांनी तो बंद करून ठेवला असल्याचे निदर्शनास आले.