मुख्य बातम्या

वयाच्या ८८व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गाणे

वयाच्या ८८व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गाणे

हवाहवाई’ चित्रपटासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा स्वरसाज

महेश टिळेकर दिग्दर्शित “हवाहवाई” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या, सदैव सळसळते उत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आवाज दिला आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी “हवाहवाई” या चित्रपटातील उडत्या चालीचे गाणे आशाताईंनी गायलं असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

“हवाहवाई” या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या “जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची…’ असे शब्द असलेलं गाणं वयाची ८८ वर्षे पूर्ण करणाऱ्या आशाताई भोसले यांच्या सुमधुर आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

भारतीय चित्रपट क्षेत्रात जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी आशाताई यांनी गाणी गायली आहेत. “हवाहवाई” चित्रपटातील त्यांचे हे गाणे ऐकून त्या ८८ वर्षाच्या आहेत यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही इतक्या अप्रतिम पद्धतीनं आशाताईंनी गाणं गायलं आहे. बऱ्याच वर्षांनी आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायल्यानं स्वाभाविकपणे या गाण्याविषयी आणि महेश टिळेकर दिग्दर्शित “हवाहवाई” चित्रपटाविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात काही नवीन कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे.

Most Popular

To Top